टेंभुर्णी: जाफ्राबाद तालुक्यातील टेंभुर्णी परिसरात मंगळवारी (दि.२८) सायंकाळी झालेल्या तुफानी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. काढणीला आलेल्या पिकांची नासाडी झाल्याने शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडले आहेत.
परतीच्या पावसाने टेंभुर्णी मंडळातील जवळपास शेकडो एकर क्षेत्रातील कपाशी, सोयाबीन, मका आणि तूर या प्रमुख पिकांचे अतोनात नुकसान केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास या अवकाळी पावसाने हिरावून घेतला आहे. तलाठी सजेच्या हद्दीतील सुनीताताई अंभोरे यांच्या गट क्रमांक ४४३ मधील तसेच संतोष शिंदे यांच्या पाच एकर शेतातील कपाशी पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. या दोन शेतकऱ्यांसह संपूर्ण टेंभुर्णी शिवारातील शेतकऱ्यांना या नुकसानीचा फटका बसला आहे. यामुळे शेतकरी पुरते चिंताग्रस्त झाले आहेत.
या गंभीर नुकसानीच्या पार्श्वभूमीवर, महसूल विभागाने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना त्वरित मदत जाहीर करावी आणि आर्थिक दिलासा द्यावा, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे. विनायक ढवळे, सुनिताताई अंभोरे, संतोष शिंदे, भिकनखाँ पठाण, संतोष खाडेभराड, शाम खरात आदी शेतकऱ्यांनी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांकडे ही मागणी लावून धरली आहे.