"... हे महाराष्ट्रासाठी लज्जास्पद" : संभाजीराजे  File Photo
जालना

"... हे महाराष्ट्रासाठी लज्जास्पद" : संभाजीराजे

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठा आरक्षण प्रश्‍नी मनोज जरांगे-पाटील यांचे उपोषण सुरु आहे. उपोषणाचा आजचा (दि.२३) सातवा दिवस. मराठा आरक्षणबाबत सत्ताधारी-विरोधक एकत्र येवून स्पष्ट भूमिका का घेत नाहीत? या प्रश्‍नी सत्ताधारी आणि विरोधक दोघेही बघ्याची भूमिका घेत आहेत. हे महाराष्ट्रासाठी लज्जास्पद आहे., अशा शब्‍दांमध्‍ये संभाजीराजे छत्रपती यांनी सत्ताधार्‍यांसह विराेधी पक्षांवर निशाणा साधला. मनोज जरांगे-पाटील यांची उपोषण स्थळी भेट घेतल्‍यानंतर ते माध्यमांशी बोलत हाेते. (Maratha Reservation)

आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवा

विधानसभेच्या पटलावर चर्चा होणं गरजेचं आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. सर्वांनी मिळून मनोज जरांगे पाटलांचा गेम करू नये. फसवू नये. कॅबिनेटमध्ये निर्णय घेता येत नाही. तर विधानसभेच्या पटलावर निर्णय घ्या. आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवा, अशी मागणी संभाजीराजेंनी केली. सत्ताधारी दखल घेत नसतील, तर तुम्ही सत्तेत या. अनेक मार्ग आहेत. त्यातून मार्ग निघू शकतात. म्हणून विधानसभेच्या पटलावर होऊ द्या. नुसता पाठिंबा देऊन चालणार नाही. अधिवेशन झाले पाहिजे. त्यातून मार्ग निघेल. मनोज जरांगे यांची अधिवेशनाची मागणी रास्त आहे. पाडायचं पाहू नका, आता निवडून कसं आणायचं पाहा. आमच्यासोबत नाही आला तरी चालेल, पण तुम्ही सत्तेत आलेच पाहिजे. सत्ताधारी दखल घेत नसतील तर तुम्ही सत्तेत या.

जरांगेना काय झाले तर सरकार जबाबदार

मी मनोज जरांगे-पाटील यांची विचारपूस करण्यासाठी आलो आहे. मराठा आरक्षणासाठी त्यांचा लढा हा प्रामाणिक आहे. त्यांची तब्येत ढासळत आहे. जरांगे यांचा जीव महत्त्वाचा आहे. त्यांनी आपली तब्येत सांभाळावी. जर त्यांना काय झाले तर, सत्ताधारी-विरोधक दोन्ही जबाबदार असतील, असेही या वेळी संभाजीराजे म्‍हणाले. मला जरांगे यांची तब्येत बघवत नाही. मी राजकारणासाठी आलो नाही. गरीब मराठ्यासाठी न्याय देण्याकरता लढा उभा करतो. काल माझं मन बैचेन झालं होतं. उद्या काही गडबड झाली तर संभाजी छत्रपती पोहोचलाच नाही तिथे असं नको व्हायला, असेही ते म्हणाले.

Maratha Reservation : आजच्या बैठकीय काय तो निर्णय घेवून टाका

मराठा आरक्षणाबाबत अद्याप निर्णय घेतला नाही. सत्ताधारी-विरोधक एकत्र येवून मराठा आरक्षणाबाबत स्पष्ट भूमिका का घेत नाहीत? सत्ताधारी आणि विरोधक दोघेही बघ्याची भूमिका घेत आहेत. हे महाराष्ट्रासाठी लज्जास्पद आहे. या प्रश्‍नाचे गांभीर्य नसेल तर सरकारमध्ये राहून काय उपयोग? असा सवालही त्‍यांनी केला. मराठा आरक्षणाबाबत मंत्रीमंडळाच्या निर्णयानंतर आज (दि.२३) सह्याद्री अतिथीगृहावर  उपसमितीची बैठक होत आहे. आजच्या बैठकीय काय तो निर्णय घेवून टाका, असे असे आवाहनही त्‍यांनी केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT