Manoj Jarange : आम्हाला एकटे पाडण्याचा राजकीय डाव Pudhari FIle Photo
जालना

Manoj Jarange : आम्हाला एकटे पाडण्याचा राजकीय डाव

मराठा आरक्षणावर सुरू असलेल्या राजकारणावरून मराठा आंदोलनाचे नेते जरांगे यांनी जोरदार शुक्रवारी टीका केली.

पुढारी वृत्तसेवा

वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा : आमच्या काही लोकांच्या व ओबीसीतील काही जणांच्या माध्यमातून आम्हाला एकटे पाडण्याचा राजकीय डाव रचला जात असल्याचा आरोप मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केला.

मराठा आरक्षणावर सुरू असलेल्या राजकारणावरून मराठा आंदोलनाचे नेते जरांगे यांनी जोरदार शुक्रवारी टीका केली. छगन भुजबळ आणि मराठा गोलमेज परिषदेवर निशाणा साधताना ते म्हणाले की, आमच्या काही लोकांच्या आणि ओबीसीतील काही जणांच्या माध्यमातून आम्हाला एकटे पाडण्याचा, गैरसमज पसरवण्याचा आणि राजकीय डाव रचण्याचा प्रयत्न सुरू आहे.

हैदराबाद गॅझेट निर्णयाविरोधात रिट याचिका दाखल करण्याच्या भुजबळांच्या आवाहनावर बोलताना जरांगे म्हणाले की, त्या येवल्यावाल्याला कोणाचे कल्याण व्हावे असे कधीच वाटत नाही. हा ओबीसी आणि मराठ्यांमध्ये दंगली लावून मोकळा होईल. अंतरवली सराटीतील लाठीचार्जबाबत भुजबळांनी केलेल्या आरोपांना उत्तर देताना जरांगे म्हणाले, भुजबळ मराठाविरोधी आहे. सरकारने चौकशी केली, त्याला काय माहिती आहे? त्याचे आता आत जायचे दिवस जवळ आले आहेत. गरीब मराठा आणि ओबीसींनी संयम बाळगावा.

गोलमेज परिषदेवर बोलताना जरांगे पाटील म्हणाले, त्यांच्यावर मला काही बोलायचं नाही, आपलं गरिबांचं काम चालू आहे.

मी बघण्यापेक्षा त्यांच्या नेत्याला कळायला पाहिजे. तुम्ही स्वतःला ज्ञानी, अभ्यासक समजता, पण हीच ताकद जर तुम्ही एसटी आरक्षणासाठी लावली असती, तर आतापर्यंत तुम्हाला आरक्षण मिळाले असते. तिकडे (एसटी आरक्षणासाठी) दोन महिने धावले असते, तर आतापर्यंत धनगर समाजाने तुम्हाला डोक्यावर घेतले असते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT