जालना :गेल्या 70 ते 80 वर्षांपासून मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवण्यात आले होते. मात्र, आता चित्र बदलणार असून, येत्या एका वर्षाच्या आत मराठवाड्यातील सगळा मराठा समाज ओबीसी आरक्षणात समाविष्ट होणार, असा ठाम विश्वास मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी व्यक्त केला आहे. जालना येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी ही ग्वाही दिली.
जरांगे यांनी प्रशासनाच्या कारभारावर ताशेरे ओढले. ते म्हणाले, मराठवाड्यात मराठा समाजाच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत, तरीही त्यांना प्रमाणपत्र दिले जात नाही. गरीब मराठा समाजाला जाणूनबुजून वेठीस धरले जात आहे. विशेषतः हैदराबाद गॅझेटच्या आधारे अर्ज केलेल्या बांधवांनाही प्रमाणपत्र नाकारले जात आहे.
काही अधिकारी जाणीवपूर्वक मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप जरांगे यांनी केला. अर्जात कोणतीही त्रुटी नसतानाही, केवळ त्रुटीचे कारण पुढे करून अर्ज बाजूला ठेवले जात आहेत. अधिकाऱ्यांनी हा धडाका लावला असून, ही अडवणूक थांबली पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.
70 वर्षांचा अन्याय दूर होणार : मराठा समाजाला आरक्षणासाठी मोठा लढा द्यावा लागला आहे. गेल्या अनेक दशकांपासूनचा हा अन्याय आता दूर होण्याची वेळ आली आहे. वर्षभरात ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा होईल, असे सांगत जरांगे यांनी समाजबांधवांना आश्वस्त केले.