तळणी : मंठा तालुक्यातील गारटेकी शिवारात शेगाव-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी (दि. २२) सकाळी साडेआठच्या सुमारास अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला. विष्णू अंकुश राठोड (वय ४८, रा. माळेगाव) असे मृत शिक्षकाचे नाव असून, ते दहिफळ खंदारे येथील ज्ञानदीप हायस्कूलमध्ये कार्यरत होते.
विष्णू राठोड हे (दुचाकी क्र. एमएच २१, एवाय २९३५) तळणी येथुन शाळेकडे जात असताना गारटेकी शिवारात अज्ञात भरधाव वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात ते महामार्गालगतच्या नाल्यात कोसळले. गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
अपघातानंतर वाहनचालक वाहनासह फरार झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. राठोड यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. फरार वाहनचालकाचा शोध सुरू असून, त्याच्या विरोधात मंठा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
दोन दिवसांत दुसरा भीषण अपघात
दरम्यान, याच महामार्गावर २० ऑक्टोबर रोजी झालेल्या अपघातात एका दुचाकीस्वाराचा पाय गंभीर जखमी झाल्याने तो कापावा लागला होता. ही घटना ताजी असतानाच गुरुवारी शिक्षकाचा अपघाती मृत्यू झाल्याने महामार्गावरील वाढत्या अपघातांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. वारंवार घडणाऱ्या अपघातांमुळे वाहनचालकांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त होत असून, महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.