तळणी ः मंठा तालुक्यातील पूर्णा नदीपात्रातून होणाऱ्या अवैध वाळू उत्खननासंदर्भात मंगळवारी तहसीलदार सुमन मोरे यांनी काही ठिकाणी अवैध वाळू वाहतुकीच्या ठिकाणाची पाहणी केली. यावेळी तहसीलदार मोरे या येत असल्याचे पाहताच टेम्पो चालकाने टेम्पोसह पूर्णा नदीपात्रातून धूम ठोकली होती.
या टेम्पोचा पाठलाग करून तहसीलदार मोरे यांनी बेलोरा चौफुलीजवळ पकडला. यावेळी टेम्पो चालकाने हायड्रोलिक करून वाळू खाली रिचवण्याचा देण्याचा प्रयत्न केला.
मंठा तालुक्यातील पूर्णा नदीपात्रातून दहा ते अकरा ठिकाणांहून अवैध वाळू उत्खनन सुरू असून त्यांच्यावर ठोस कारवाई होणे गरजेचे आहे. ज्या ग्रामपंचायत हद्दीमध्ये हा अवैध वाळू उपसा होतो. त्या ग्रामपंचायतीवर महसूल नियमानुसार बोजा टाकण्यात यावा जेणेकरून अवैध वाळू वाहतुकीला थोड्या प्रमाणात का होईना लगाम लागणार आहे.
ग्रामपंचायत हद्दीत येत असलेल्या गौण खनिजाचे संरक्षण करणे हे ग्रामपंचायतीचे कर्तव्य असतानासुद्धा पूर्णा नदीकाठावरील अनेक ग्रामपंचायती या वाळू चोरांना एक प्रकारे छुपी मदत करत असल्याचा प्रकार समोर येत आहे.
टेम्पोला दंड
अवैध वाळू वाहतुकीवर कारवाया सुरू आहेत. वाळू चोरांचे खबरे नेहमी पाळत ठेवत असल्याने कारवाया करण्यात अडचणी येत आहे या टेम्पोवर सव्वा लाख रुपयांचा दंड आकारण्यात येणार असल्याचे मंठा तहसीलदार सुमन मोरे यांनी सांगितले.