Maratha reservation Manoj Jarange Patil News
मराठा आरक्षणाबाबत उद्यापासून मराठा जनजागृती रॅली काढण्यात येणार आहे Pudhari File Photo
जालना

मनोज जरांगे पुन्हा अॅक्शन मोडमध्ये; उद्यापासून करणार मराठा जनजागृती

पुढारी वृत्तसेवा

वडीगोद्री : मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील मराठवाड्यात शनिवारपासून (दि.६) मराठा आरक्षण शांतता जनजागृती रॅली काढणार आहेत. ही रॅली ६ जुलै ते १३ जुलै दरम्यान होणार असून उद्या हिंगोलीपासून या रॅलीला सुरुवात होणार आहे तर या रॅलीचा समारोप छत्रपती संभाजीनगर येथे आहे. संपूर्ण मराठवाड्यात पहिल्या टप्प्यात ही रॅली होणार असून त्यानंतर महाराष्ट्रात ५ टप्प्यात ही रॅली काढण्यात येणार आहे. राज्यातील सर्व भागात टप्प्या-टप्प्याने मराठा समाजाची जनजागृती रॅली निघणार असल्याचे मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

मराठा आंदोलनामुळे आपल्या पदरात आरक्षण पडले. यामध्ये कोणीही राजकारण आणू नये, मराठा समाजाला घराबाहेर पडल्याशिवाय मराठ्यांना न्याय मिळणार नाही. त्यामुळे मराठ्यांनी प्रत्येक जिल्ह्याच्या रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. सरकारने आरक्षण  दिलं नाही तर आम्हाला आरक्षण देणारे बनावे लागेल. त्यासाठीच जनजागृती लढा सुरू केला आहे. जनजागृती रॅली हे शक्तिप्रदर्शन नाही. तसेच हा निवडणुकीचा विषय नाही. आम्ही आमच्या मागण्यासाठी एकत्र येत आहोत, असेही जरांगे-पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.

मराठा समाजाच्या जनजागृती रॅलीवरुन ओबीसी नेते आक्रमक झाल्यासंबंधी प्रश्न विचारण्यात आला असता, जरांगे पाटील म्हणाले, "लोकशाही असून, कायद्याने अधिकार दिला असताना दौऱ्याला विरोध कऱण्याचं कारण काय आहे. हिंगोलीतून आमच्या रॅलीला सुरुवात होत आहे. ओबीसी नेते समजून घेण्यास तयार नाहीत. पण राजकीय स्वार्थासाठी विरोध कऱण्याची सवय लागली आहे. या शांतता रॅलीमध्ये घुसून गालबोट लावण्याचा प्रयत्न होईल, अशी शंकाही मनोज जरांगे-पाटील यांनी यावेळी व्यक्त केली. आमच्या शांतता रॅलीमध्ये मुद्दाम वाद निर्माण केला जाऊ शकतो, त्यामुळे सरकारने बारीक लक्ष ठेवण्याचे आव्हानही त्यांनी यावेळी केले.

SCROLL FOR NEXT