Manoj Jarange Patil Dhananjay Munde (Pudhari Photo)
जालना

Manoj Jarange Patil | 'गुंडगिरीच्या जोरावर राजकारण'; मुंडेंच्या वाल्मिकबद्दलच्या विधानावर जरांगे-पाटील यांची प्रतिक्रिया

परळीतील सभेदरम्यान आमदार धनंजय मुंडे यांनी वाल्मिक कराड यांची आठवण काढल्याच्या मुद्द्यावरून वातावरण तापले

पुढारी वृत्तसेवा

Manoj Jarange Patil vs Dhananjay Munde

जालना : परळीतील सभेदरम्यान आमदार धनंजय मुंडे यांनी वाल्मिक कराड यांची आठवण काढत, “आपला एक सहकारी आज आपल्यात नाही याची खंत आहे” असे वक्तव्य केले. त्यांच्या या विधानावर मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे–पाटील यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली.

जरांगे–पाटील म्हणाले की, “धनंजय मुंडे वाल्मिक कराड यांची उणीव भासत असल्याचे म्हणत असतील तर ही अत्यंत गंभीर बाब आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणातील आरोपीची उणीव भासणे योग्य नाही.” त्यांनी पुढे आरोप करत सांगितले की, “वाईट कृत्य करणाऱ्या कोणाच्याही पाठिशी उभे राहू नये. अजित पवार यांनीही आता तरी याची दखल घ्यायला हवी.”

पुढे बोलताना जरांगे–पाटील यांनी धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यावर अनेक आरोप केले. त्यांच्या म्हणण्यानुसार, “गुंडगिरी, भ्रष्टाचार आणि समाजातील काही व्यक्तींना गुन्हेगारीकडे वळवून ब्लॅकमेल करण्यास प्रवृत्त करण्यात कराड सहभागी होता,” असा आरोप त्यांनी केला. तसेच मुंडे हेही “गुंडगिरीच्या जोरावर राजकारण करत असल्याचे” ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले, “धनंजय मुंडे माझ्या हत्येच्या कटाबाबतही मौन बाळगतात. अनेकदा नार्को टेस्टचे आव्हान दिले, तरी ते पुढे येत नाहीत.” जरांगे–पाटील यांनी गृह खात्याकडेही मागणी केली की, “बीडच्या जेलरचे निलंबन का करण्यात आले, याची चौकशी करावी.”

पत्रकारांशी बोलताना त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भूमिकेवर सवाल उपस्थित करत म्हटले की, “अशा व्यक्तींना तुम्ही किती दिवस पाठीशी घालणार आहात?”

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT