(File Photo)
जालना

Manoj Jarange Patil : 'आता माघार नाही, आंदोलन होणारच!' मनोज जरांगे-पाटील यांची घोषणा

उपसमिती म्हणजे रडगाणं, नेत्यांनी जातीसाठी उभं राहावं; मुंबईतील आंदोलनावर ठाम

पुढारी वृत्तसेवा

जालना : मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी पुन्हा एकदा रणशिंग फुंकताना, मनोज जरांगे पाटील यांनी मंगळवारी (२७ ऑगस्ट) सायंकाळी ७ वाजता घेतलेल्या पत्रकार परिषदेत सरकारवर जोरदार हल्ला चढवला. ‘आता सरकारला बोलायला कुठेही जागा नाही, आम्ही हे आंदोलन स्थगित करणार नाही आणि न्याय मिळवणारच,’ असा थेट इशारा देत त्यांनी मुंबईतील आंदोलनावर ठाम असल्याचे स्पष्ट केले. त्यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे मराठा आरक्षणाचा लढा पुन्हा एकदा निर्णायक वळणावर येऊन पोहोचला आहे.

आरक्षण उपसमिती म्हणजे निव्वळ रडगाणं

सरकारने नेमलेल्या आरक्षण उपसमितीच्या कार्यपद्धतीवर जरांगे पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, ‘आरक्षण उपसमिती नेहमीच बैठका घेते. ही उपसमिती म्हणजे पहिलंच रडगाणं आहे. अंमलबजावणीसाठी एवढा वेळ का लागत आहे? कुणीही अंमलबजावणी द्या, अगदी कोतवालाच्या हातून दिली तरी चालेल, पण ती तात्काळ झाली पाहिजे.’

जरांगे यांनी सरकारवर टीका करताना सात महिन्यांपासून अंमलबजावणी रखडल्याचा आरोप केला. ते म्हणाले, ‘मी उपोषण केल्यानंतर शिंदे समितीला मुदतवाढ दिली, हे आधीचंच आहे. पण सात महिने उलटूनही आमच्या मागण्या कागदावरच आहेत,’ असे म्हणत त्यांनी सरकारला जाब विचारला.

नेत्यांनो, जातीच्या शिव्या-शाप घेऊ नका!

या पत्रकार परिषदेत जरांगे पाटील यांनी मराठा समाजातील राजकीय नेत्यांना भावनिक साद घालत त्यांना खडे बोल सुनावले. त्यांनी समाजाच्या प्रगतीचा ध्यास घेतला असल्याचे सांगत नेत्यांना मोलाचा सल्ला दिला.

‘मराठ्यांनी मराठ्यांवर आरोप करण्याचे दिवस आता गेले. आमची तळमळ मराठा समाजातील नेत्यांनी समजून घ्यावी,’ असे म्हणत त्यांनी समाजातील नेत्यांना एकत्र येण्याचे आवाहन केले.

‘ही एक मोठी संधी आहे, ती जाऊ देऊ नका. मराठा नेत्यांनी आता आपल्या जातीसाठी उभं राहावं आणि जातीला थोडं झुकतं माप द्यावं. तुम्ही समाजाच्या भावना समजून घ्या. जातीचे शिव्या-शाप घेऊ नका,’ असे आवाहन केले.

न्यायालयीन लढाईसाठी सज्ज, आंदोलन होणारच

जरांगे मुंबईत होणाऱ्या आंदोलनाला परवानगी मिळण्याबाबत आशावादी दिसले. ते म्हणाले की, ‘आमचे वकिलांशी बोलणं झालेलं आहे. आझाद मैदानावरील आंदोलनाल आम्हाला परवानगी नक्की मिळेल,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आम्ही सर्व नियम पाळून शांततेच्या मार्गाने आंदोलन करणार आहोत. पण आता आंदोलन करावंच लागणार आणि न्याय घ्यावाच लागणार आहे,’ या शब्दांत त्यांनी आपली भूमिका मांडली.

येत्या काळात सरकार काय भूमिका घेणार आणि मुंबईतील आंदोलनाचे स्वरूप काय असणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT