Manoj Jarange: I will reveal the names of those working against the community, along with evidence
वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा कमालीचे तापले आहे. सरकारमधील काही व्यक्ती मराठा समाजाच्या विरोधात काम करत असल्याचा थेट दावा मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी केला आहे. सरकारमधील कोण कोणाच्या संपर्कात आहे, कोणाला कोणी पैसे दिले आणि समाजाच्या विरोधात कोण काम करत आहे, याबाबतचे भक्कम पुरावे आपल्याकडे येत असून येत्या दीड महिन्यात संबंधितांची नावे पुराव्यांसह माध्यमांसमोर उघड करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
५०० कोटी रुपयांच्या आरोपप्रकरणी एसआयटीचे (विशेष चौकशी पथक) पथक बुधवारी अंकुशनगर येथील त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले होते. हे पथक आपल्याकडील ऑडिओ क्लिप घेण्यासाठी आले होते; मात्र क्लिपचा स्रोत उघड करण्यास आपण नकार दिल्याचे जरांगे यांनी स्पष्ट केले. क्लिप देणाऱ्या व्यक्तीच्या जीविताला धोका असल्याने त्याची ओळख उघड करता येणार नाही. क्लिप हवी असल्यास मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी संबंधित व्यक्तीच्या सुरक्षिततेची लेखी जबाबदारी स्वीकारावी, अशी मागणी त्यांनी केली.
माझ्याआधी रामदास कदम यांनीही ही क्लिप वाजवली होती, त्यामुळे त्यांना क्लिप कोणी दिली याचीही चौकशी झाली पाहिजे, असे जरांगे म्हणाले. सरकारमधील काही मंत्री व आमदार कोणाच्या संपर्कात आहेत, कोणाला मदत करत आहेत आणि कोणाकडून पैसे घेतले जात आहेत, याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचत असल्याचे सांगत आपलीही काही यंत्रणा कार्यरत असल्याचे त्यांनी सूचकपणे नमूद केले. मराठा समाजाने मोठे केलेल्या काही व्यक्तीच आता समाजाच्या विरोधात भूमिका घेत असल्याचा आरोप करत त्यांनी नाव न घेता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही टीका केली.
रामदास कदमांचीही चौकशी करा 'एसआयटी'कडे मागणी
मंत्रिपदाचा गैरवापर करून मराठा तरुणांवर खोट्या केसेस दाखल करण्यासाठी दबाव आणला जात असल्याचा दावाही त्यांनी केला. गेल्या ३ वर्षांपासून आपली बदनामी करून मराठा आंदोलन मोडून काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही जरांगे यांनी केला. आपल्याविरोधात बोलण्यासाठी काही लोकांना पुढे केले जात असून त्यांना पैसे दिले जात असल्याचेही त्यांनी म्हटले. जरांगे यांच्या या खळबळजनक दाव्यांमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
तर राजकीय करिअर बरबाद करू
"माझ्या नादी लागू नका, शहाणे व्हा. तुमचे राजकीय करिअर बरबाद करू नका. माझ्याकडे अनेक पुरावे आले आहेत," असा थेट इशारा मनोज जरांगे यांनी मराठा समाजाच्या विरोधात काम करणाऱ्यांना दिला आहे. कोणत्याही परिस्थितीत समाजद्रोही व्यक्तींना सोडणार नसल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.