Make QR codes mandatory for development works
जाफराबाद, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यात विविध शासकीय विभागांतर्गत कोट्यवधी रुपयांची विकासकामे सुरू असून, या कामांमध्ये अधिक पारदर्शकता यावी, यासाठी प्रत्येक विकासकामाच्या ठिकाणी क्यूआर कोड असलेला माहिती फलक अनिवार्य करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.
तालुक्यात तसेच शहरात रस्ते, सिमेंट काँक्रीट रस्ते, बंधारे, जलजीवन मिशनतर्गत पाणीपुरवठा योजना, ग्रामपंचायत विकासकामे, शाळा दुरुस्ती, अंगणवाडी इमारती, समाजमंदिरे, स्मशानभूमी, गटारे आदी विविध कामांवर मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला जात आहे. मात्र, मंजूर निधी, प्रत्यक्ष खर्च, कंत्राटदार, कामाचा कालावधी व दर्जा याबाबतची माहिती नागरिकांना सहज उपलब्ध होत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
नागरिकांच्या मते, प्रत्येक विकासकामाच्या ठिकाणी क्यूआर कोडयुक्त माहिती फलक उभारल्यास मोबाईलद्वारे कोड स्कॅन करून संबंधित कामाचे नाव, मंजूर अंदाजपत्रक, प्रशासकीय मान्यता, कंत्राटदार, खर्चाचा तपशील, कामाची मुदत आणि इतर माहिती सहज पाहता येईल. त्यामुळे विकासकामांमध्ये पारदर्शकता वाढण्यास मदत होईल. यामुळे क्यूआर कोड बंधनकारक करा.
लोकनियंत्रण प्रभावी
यासंदर्भात सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात शासनाने धोरणात्मक निर्णय घेऊन राज्यातील सर्व विकासकामांसाठी क्यूआर कोड प्रणाली बंधनकारक करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या निर्णयामुळे लोकनियंत्रण अधिक प्रभावी होऊन सार्वजनिक निधीच्या वापराबाबत उत्तरदायित्व वाढेल, असा विश्वासही नागरिकांनी व्यक्त केला आहे.