‘महावितरण’ Pudhari file Photo
जालना

Mahavitaran crackdown on electricity theft- वीजचोरांविरुद्ध महावितरणचा दणका !

अंबड शहरात ३ लाख ५० हजारांच्या वीजचोरी; २३ जणांविरुद्ध गुन्हे दाखल

पुढारी वृत्तसेवा

अंबड : अंबड शहरातील वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणच्या अंबड शहर शाखेने विशेष मोहीम हाती घेतली असून, या मोहिमेंतर्गत २३ जणांविरुद्ध दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संबंधितांकडून १५ हजार ६६३ युनिट विजेचा अनधिकृत वापर झाल्याचा आरोप असून, या वीजचोरीचे एकूण मूल्य ३ लाख ५० हजार ११७ रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. भारतीय विद्युत अधिनियम, २००३ मधील कलम १३५ अन्वये संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

विशेष पथकाने अंबड शहरातील विविध भागांत वीजचोरी शोधण्यासाठी तपासणी केली. पहिल्या प्रकरणात १० ते २२ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत करण्यात आलेल्या तपासणीत १३ जणांनी अनधिकृतपणे वीज वापरल्याचा आरोप आहे. या प्रकरणात १० हजार ९९६ युनिट विजेच्या चोरीचे मूल्य २ लाख २९ हजार ४३६ रुपये आहे. दुसऱ्या प्रकरणात २४ ते २६ सप्टेंबर २०२६ या कालावधीत करण्यात आलेल्या तपासणीत १० जणांनी ४ हजार ६६७ युनिट विजेचा अनधिकृत वापर केल्याचा आरोप आहे. या विजेचे मूल्य १ लाख २० हजार ६८१ रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी परतूर येथील वीज मंडळाच्या पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही गुन्हे मंगळवार, दि. २७ रोजी दाखल करण्यात आले. महावितरणच्या विशेष पथकाने केलेल्या तपासणीत अधिकृत विद्युत वाहिन्यांवर आकडे टाकून अनधिकृतपणे वीज वापरल्याचे आढळल्याचा दावा फिर्यादीत करण्यात आला आहे.

संबंधित ठिकाणी वीजवापराची तपासणी करून चोरीच्या विजेचे मूल्य निश्चित करण्यात आले. त्यानंतर संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली. महावितरणच्या जालना मंडळाचे अधीक्षक अभियंता जरग आणि जालना विभाग क्रमांक दोनचे कार्यकारी अभियंता अल्हाट यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम राबविण्यात आली. सहायक अभियंता लक्ष्मण गुलाबराव पुंडे यांच्या नेतृत्वाखाली अंबड शहर शाखेतील सर्व जनमित्रांनी मोहिमेत सहभाग नोंदविला.

वीजचोरीमुक्त अंबडसाठी महावितरणचा निर्धार

वीजचोरीमुळे महावितरणचे आर्थिक नुकसान होते. तसेच अनधिकृत वीजजोडण्यांमुळे विद्युत यंत्रणेवर अतिरिक्त भार पडून वीजपुरवठ्याच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो. अशा जोडण्यांमुळे विद्युत अपघातांचाही धोका निर्माण होतो. त्यामुळे नागरिकांनी अधिकृत वीजजोडणी घेऊनच विजेचा वापर करावा. विद्युत वाहिन्यांवर आकडे टाकून किंवा अन्य अनधिकृत मार्गाने वीज वापरणे टाळावे, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे. अंबड शहर वीजचोरीमुक्त करण्यासाठी विशेष तपासणी मोहीम यापुढेही सुरू ठेवण्यात येणार असून, वीजचोरी आढळल्यास संबंधितांविरुद्ध भारतीय विद्युत अधिनियम, २००३ नुसार कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही महावितरणच्या वतीने देण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT