Maha Walkathon : 'महा वॉकेथॉन'ने दिली मृद, जलसंधारणाची हाक file photo
जालना

Maha Walkathon : 'महा वॉकेथॉन'ने दिली मृद, जलसंधारणाची हाक

जलसंधारण दिनानिमित्त आयोजित 'महा वॉकेथॉन'ला उत्स्फूर्त प्रतिसाद

पुढारी वृत्तसेवा

'Maha Walkathon' raises awareness for soil and water conservation

जालना, पुढारी वृत्तसेवा जलसंधारणाचे महत्त्व जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्ह्यात जलसंधारण दिनानिमित्त आज (दि.21) रोजी 'महावॉकेथॉन'चे आयोजन करण्यात आले होते. येथील जिल्हाधिकारी कार्यालयापासून पोलिस मैदानापर्यंत झालेल्या या वॉकेथॉनमध्ये मोठ्या संख्येने शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थी, युवक, ज्येष्ठ नागरिकांसह विविध क्षेत्रातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी महापौर वंदना मगरे, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या उपस्थितीत उपस्थितांनी जलसंधारणाची शपथ घेतली. त्यानंतर हिरवा झेंडा दाखवूनवॉकेथॉनला प्रारंभ करण्यात आला.

यावेळी मृद व जलसंधारण विभागाचे सहाय्यक कार्यकारी अभियंता श्रावण उदयभान शेंडे, कार्यालयीन अधीक्षक के. एस. जावळे यांची उपस्थिती होती. येथील जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय, सतकर कॉम्प्लेक्स, अंबड चौफुली मार्गे पोलीस मैदान असा वॉकेथॉनचा मार्ग होता. सहभागी नागरिकांनी उत्साहात ३.१ किलोमीटर महावॉकेथॉनचे अंतर पूर्ण केले.

यावेळी जलसंधारणाचे महत्त्व सांगणाऱ्या घोषणा देत, पाणी बचत व जलसंवर्धनाबाबत जनजागृती करण्यात आली. पोलीस मैदानावर झालेल्या समारोप कार्यक्रमात जिल्हाधिकारी आशिमा मित्तल आणि महापौर वंदना मगरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी जलसंधारणाची कामे आणि पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

यावेळी लकी ड्रॉमधून दहा विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली. तसेच जिल्ह्यातील जलदूत, विविध सेवाभावी संस्था आणि रोटरी क्लब, जालना यांचा सन्मान करण्यात आला. महावॉकेथॉनमध्ये सहभागी विद्यार्थी-विद्यार्थिनी, नागरिक आणि सहकार्य करणाऱ्या विविध संस्थांचे महापौर वंदना मगरे आणि जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी आभार मानले. जलसंधारणाचा संदेश जनमानसात पोहोचविण्याच्या संकल्पाने कार्यक्रमाची सांगता झाली.

या महावोंकेथॉनमध्ये जालना शहरातील शांती निकेतन विद्यामंदिर, जिल्हा परिषद क्रीडा प्रबोधिनी, मत्स्योदरी कॉलेज, शासकीय नर्सिंग कॉलेज, जेईएस महाविद्यालय यांच्यासह विविध शाळा-महाविद्याल-यांतील विद्यार्थी-विद्यार्थिनी, शासकीय-निमशासकीय कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT