जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी लोणीकर, तर उपाध्यक्षपदी मरकड बिनविरोध file photo
जालना

Jalna News : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी लोणीकर, तर उपाध्यक्षपदी मरकड बिनविरोध

शेतकऱ्यांच्या हितासाठी एकजुटीने प्रयत्न करावेत : माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे

पुढारी वृत्तसेवा

Lonikar elected unopposed as Chairman and Markad as Vice-Chairman of the District Central Cooperative Bank

जालना, पुढारी वृत्तसेवा : जिल्हा मध्यवर्ती बँकेची आर्थिक ताकद अधिक वाढविण्यासाठी सर्व सहकारी साखर कारखाने, विविध सहकारी संस्था तसेच जिल्हा परिषदेची खाती टप्प्याटप्प्याने जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे वळविण्यासाठी प्रयत्न केले जातील. या निर्णयामुळे बँकेच्या आर्थिक व्यवहारात मोठी वाढ होऊन शेतकरी, सभासद आणि सहकारी संस्थांना अधिक सक्षम आर्थिक सेवा उपलब्ध होतील, असा विश्वास माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला.

बुधवार, दि. ५ रोजी जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी राहुल बबनराव लोणीकर तर उपाध्यक्षपदी निर्मला दीपकराव मरकड यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी आयोजित सत्कार सोहळ्यात माजी राज्यमंत्री दानवे बोलत होते.

निवड प्रक्रियेवेळी माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे, आमदार तथा माजी मंत्री बबनराव लोणीकर, आमदार अर्जुनराव खोतकर, माजी आमदार राजेश टोपे, आमदार नारायणराव कुचे, आमदार संतोष दानवे, माजी आमदार कैलास गोरंट्याल माजी आमदार अरविंदराव चव्हाण माजी आमदार शिवाजीराव चोथे, माजी अध्यक्ष सतीश टोपे, माजी उपाध्यक्ष भीमराव जावळे, यांच्यासह सर्व संचालक, संचालिका व मान्यवर उपस्थित होते.

अध्यासी अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था विष्णू रोडगे यांनी, तर कार्यकारी संचालक आशुतोष देशमुख यांनी निवड प्रक्रियेचे कामकाज यशस्वीरीत्या पार पाडले. जिल्हा मध्यवर्ती बँकेला राज्यातील आदर्श सहकारी बँक बनविण्याचा संकल्प नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल लोणीकर यांनी यावेळी व्यक्त केला. यवेळी भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर दानवे, माजी सभापती संदीपराव मोरे, बँकेचे संचालक सर्वश्री भाऊसाहेब जाधव, शालिग्राम मस्के, रितेश कामट, संचालिका शीतल कुचे, मनीषा उढाण मनीषा गोरे सुनीता खरात आदींसह सर्व संचालक, सदस्य आर्दीसह पदाधिकारी उपस्थित होते.

मतभेद बाजूला ठेवू : आमदार लोणीकर

जिल्ह्याला यावर्षी २१२५ कोटी रुपये कर्जमाफीसाठी मिळणार आहेत, त्यात सर्वाधिक वाटा जिल्हा मध्यवर्ती बँकेचा आहे जिल्हा बँकेच्या विकासासाठी राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्वपक्षीय नेतृत्वाने एकत्र यावे. ही सहकार क्षेत्रासाठी अभिमानाची बाब असणार आहे. ही एकजूट कायम राहील, असा विश्वास आमदार लोणीकर यांनी व्यक्त केला.

बँकेला आर्थिक स्थैर्य मिळावे : टोपे

जिल्हा मध्यवर्ती बँकेने अत्यंत कठीण आर्थिक परिस्थितीचा सामना करत पुन्हा उभारी घेतली आहे. बँकेला सुमारे २० कोटी रुपयांचे भागभांडवल उपलब्ध करून देत आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यासाठी सर्वांनी संयुक्तपणे प्रयत्न करावे. आता नव्या नेतृत्वाच्या माध्यमातून बँकेची अधिक भरमराट होईल, असे माजी मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

एकजुटीने काम करू : आमदार खोतकर

कृषी उत्पन्न बाजार समिती जालना तसेच जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांची खाती जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे वळविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे जाहीर केले. जिल्ह्याच्या प्रगतीसाठी सर्वपक्षीय सहकार्याची ही भावना भविष्यातही कायम ठेवत बँकेला नवे वैभव प्राप्त करून देण्यासाठी एकजुटीने काम करू, असा विश्वास आ. अर्जुन खोतकर यांनी व्यक्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT