Lemon prices rise jalna Pudhari
जालना

Lemon prices rise : तापमानात वाढ, लिंबाचे भाव कडाडले; उन्हाचा पारा चढल्याने मागणीत झाली वाढ

लिंबाच्या बागांना कडक उन्हाचा फटका बसल्याने फळधारणा कमी

पुढारी वृत्तसेवा

आन्वा : भोकरदन तालुक्यात होळीनंतर ऊन तापू लागल्याने नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. एकीकडे उष्णतेचा पारा चढत असतानाच, दुसरीकडे बाजारपेठेत लिंबाच्या दरानेही मोठी उसळी घेतली आहे. वाढत्या उष्णतेमुळे थंड पेयांची मागणी वाढली असून, परिणामी बाजारपेठेत लिंबाचे दर गगनाला भिडले आहेत.

सध्या वाढत्या तापमानामुळे सरबत विक्रेते, रसवंती गृहे, हॉटेल व्यावसायिक आणि घरगुती ग्राहकांकडून लिंबाला मोठी मागणी आहे. मात्र, मागणीच्या तुलनेत बाजारात लिंबाचा पुरवठा अत्यंत कमी होत असल्याने दरात सातत्याने वाढ होत आहे. किरकोळ बाजारात दोन लिंबाची किंमत 10 रुपयांवर पोहोचली आहे.पाच लिंबू 20 रुपयांना विकले जात आहेत. लिंबाची ही दरवाढ केवळ एवढ्यावरच थांबणारी नाही.

येणाऱ्या पंधरा दिवसांत उन्हाची तीव्रता आणखी वाढणार असल्याचा अंदाज असून, लिंबाचे दर अजूनही वधारण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे. तुलनेत पुरवठा कमी अन्‌‍ मागणीत प्रचंड वाढत आहे.मागणीच्या तुलनेत बाजारात होणारी लिंबांची आवक निम्म्यावर आली आहे. फेब्रुवारी संपताच उन्हाची तीव्रता अचानक वाढली असून, पारा किमान 35 तर कमाल 22 अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. सकाळपासूनच उन्हाच्या झळा लागत असल्याने नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे.

उन्हाळ्याची ही सुरुवातीची चाहूल यंदा कडक उन्हाळ्याचे संकेत देत आहे.उन्हाचा तडाखा वाढल्याने शरीरातील पाण्याची पातळी टिकवण्यासाठी नागरिक लिंबू सरबत आणि थंड पेयांकडे वळले आहेत. यामुळे शहरातील रसवंती गृहे, ज्यूस सेंटर आणि हॉटेल व्यावसायिकांकडून लिंबांची मोठी मागणी वाढत आहे. घरगुती वापरासाठीही ग्राहकांची मागणी वाढल्याने बाजारपेठेत लिंबांची खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी पहायला मिळत आहे.

लिंबाच्या बागांना कडक उन्हाचा फटका बसल्याने फळधारणा कमी झाली असून, वाढत्या वाहतूक खर्चामुळेही दरांवर परिणाम झाला. काही ठिकाणी पाण्याची टंचाई आणि झाडांची गळती यामुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. या नैसर्गिक आणि व्यापारी कारणांमुळे लिंबाच्या भावात वाढ झाली आहे.

उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच लिंबू दहा रुपयांना मिळत असल्याने, ऐन मे महिन्यात काय परिस्थिती असेल याची चिंता नागरिकांना लागली आहे. येणाऱ्या पंधरा दिवसांत तापमान अजून वाढणार असल्याने लिंबाचा दर 15 ते 20 रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे., यंदा उन्हाळ्यात लिंबू पाणी पिणे सर्वसामान्यांसाठी अधिक आंबट आणि महाग ठरणार आहे.गतवर्षी सप्टेंबरमध्ये अधिक पाऊस असल्यामुळे लिंबाचे उत्पादन घेता आले नाही, तेव्हापासून हीच स्थिती आहे. आगामी काळात लिंबू अधिक महाग होण्याची शक्यता आहे.

  • उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये लिंबाची मागणी ही मोठ्या प्रमाणावर वाढत असते. या वाढत्या मागणीचा परिणाम हा लिंबाच्या किमतीवर दिसून येतो.सध्या बाजारात वाढलेल्या किमतीमुळे शीतपेयाची किंमत देखील वाढण्याची शक्यता आहे. अनेक शीपपेयामध्ये लिंबाचा वापर हा मोठ्या प्रमाणावर होत असतो

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT