जालना : जालना शहरातून वाहणाऱ्या कुंडलिका नदीच्या स्वच्छतेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर कचरा, प्लास्टिक तसेच सांडपाणी सोडले जात असल्याने नदीचे प्रदूषण दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी जेसीबीच्या सहाय्याने नदीपात्रातील घाण व कचरा काढण्यात आला. मात्र हा कचरा लक्कडकोट पुलावरील रस्त्याच्या कडेला टाकून तसाच ठेवण्यात आल्याने परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून नागरिकांचे हाल होत आहेत.
महापालिका व समाजसेवी संस्थेच्या वतीने नदीपात्र स्वच्छ करण्यासाठी जेसीबीच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात गाळ, प्लास्टिक, साचलेला कचरा आणि इतर घाण बाहेर काढण्यात आली आहे. ही घाण तत्काळ उचलून विल्हेवाट लावणे अपेक्षित होते. मात्र दोन दिवस उलटूनही कचऱ्याचे ढिगारे लक्कडकोट पुलालगत तसेच रस्त्याच्या कडेला पडून असल्याने या मार्गाने ये-जा करणाऱ्या नागरिकांना नाक मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
विशेष म्हणजे, नदीकाठावरील काही भागातील सांडपाणी नागरिकांनी थेट कुंडलिका नदीत सोडले असल्याने नदीचे पाणी दूषित होत आहे. त्यामुळे पर्यावरणाबरोबरच सार्वजनिक आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. पावसाच्या दिवसांत ही घाण पुन्हा नदीत मिसळण्याची शक्यता असल्याने स्वच्छता मोहिमेचा उद्देशही अपूर्ण राहण्याची भीती व्यक्त होत आहे.
स्थानिक नागरिकांनी महापालिकेने केवळ नदीपात्रातील कचरा काढून न थांबता तो तातडीने उचलून वैज्ञानिक पद्धतीने विल्हेवाट लावावी, अशी मागणी केली आहे. नदीत कचरा व सांडपाणी टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई करून नियमित स्वच्छता मोहीम राबविण्याचीही आवश्यकता व्यक्त केली जात आहे.
कुंडलिका नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न अनेक वर्षांपासून कायम असून, केवळ अधूनमधून स्वच्छता मोहीम राबवून हा प्रश्न सुटणार नाही. नदीत कचरा टाकण्यास प्रतिबंध, सांडपाण्याचे योग्य व्यवस्थापन आणि स्वच्छतेनंतर तातडीने कचऱ्याची विल्हेवाट या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी झाल्यासच कुंडलिका नदी स्वच्छ व प्रदूषणमुक्त होण्यास मदत होईल.