Urea Black Marketing Exposed 
जालना

Urea Black Marketing Exposed | कुंभार पिंपळगावात युरियाचा काळाबाजार उघड

४६२ गोण्यांसह ट्रक जप्त, दोघांवर गुन्हे दाखल!, 'ई-पॉस' मशीनवर दाखवला साठा

पुढारी वृत्तसेवा

जालना : घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथे शासनाच्या अनुदानित आरसीएफ कंपनीच्या युरिया खताची अनधिकृत वाहतूक करून त्याचा काळाबाजार करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. जिल्हास्तरीय आणि विभागीय भरारी पथकाने संयुक्त कारवाई करत तब्बल १ लाख २२ हजार ८९२ रुपये किमतीच्या ४६२ युरिया खताच्या गोण्यांनी भरलेला ट्रक (क्र. एम एच ०४ डी एस ५१५५) जप्त केला आहे. याप्रकरणी घनसावंगी तालुका खत निरीक्षक तथा कृषी अधिकारी प्रवीण निवृत्ती गाडेकर यांच्या फिर्यादीवरून घनसावंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कुंभार पिंपळगाव येथील 'माऊली कृषी सेवा केंद्र' या दुकानातून युरिया खताची अनधिकृत वाहतूक आणि विक्री होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे २८ जून रोजी सकाळी ८:४० वाजता खत निरीक्षकांच्या पथकाने कुंभार पिंपळगाव येथील अंबड-पाथरी रोडवर सापळा रचला. सकाळी ९:५० च्या सुमारास संशयास्पद ट्रक गोदामातून खत घेऊन जालना रस्त्याकडे निघाला.

भरारी पथकाने तत्काळ खासगी वाहनाने या ट्रकचा पाठलाग सुरू केला. हा ट्रक जालना शहरातील वेगवेगळ्या भागांतून फिरत शेवटी जालना एमआयडीसीमध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या फॅक्टरीबाहेर येऊन थांबला. कारवाईच्या भीतीने ट्रकचालक गाडी तिथेच सोडून फरार झाला. अधिकाऱ्यांनी ट्रकची ताडपत्री उघडून पाहिली असता, त्यात मोठ्या प्रमाणात निम कोटेड युरिया खताचा साठा आढळून आला.

या प्रकरणी माऊली कृषी सेवा केंद्राचे मालक सुरेश वशिष्ठ नाईक, ट्रक मालक ज्ञानेश्वर पांडुरंग वैद्य (रा. जालना) आणि मोबाईल क्रमांक धारक अज्ञात खरेदीदार यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोहेकाँ. भीमराव राठोड याचा तपास करत आहेत. ही कारवाई विभागीय कृषी सहसंचालक छत्रपती संभाजीनगर, मुख्य गुण नियंत्रण अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

कागदावर पुरवठा, प्रत्यक्षात साठा गायब

व्ही.सी.एम.एफ. कडून मिळालेल्या २५ मेट्रिक टन युरिया खतापैकी १२ मेट्रिक टन खत हे 'आराध्या कृषी सेवा केंद्र, संकनपुरी (ता. परतूर)' येथे प्रत्यक्षात न पाठवता, केवळ ई-पॉस मशीनवरून ट्रान्सफर दाखवून उपलब्ध करण्यात आले होते. तपासातून ही बाब निष्पन्न झाली.

४५० रुपयांना एक गोणी विकण्याचा व्यवहार

हा वाचलेला खताचा साठा ट्रकमध्ये भरून एका अज्ञात खरेदीदाराला काळ्याबाजारात तब्बल ४५० रुपये प्रति गोणी (शासकीय किंमत २६६ रुपये) या चढ्या दराने विकण्याचा व्यवहार ठरला होता. मोबाईल नंबर बंद : ज्या मोबाईल क्रमांकावरून या खताची मागणी झाली होती, तो नंबर सध्या बंद असून टू-कॉलरवर त्यावर 'Jai Hind' असे नाव दिसत आहे. ट्रक मालक ज्ञानेश्वर वैद्य यानेही सुरेश नाईक यांच्या सांगण्यावरूनच ही वाहतूक करत असल्याचे मान्य केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT