Khotkar aggressive on Jalna's issues
जालना : सुहास कुलकर्णी
जालना शहरातील भटक्या कुत्र्यांसह बाल गुन्हेगारी, क्रिप्टो करन्सीच्या नावाखाली करण्यात येत असलेली फसवणूक, जालना शहरात वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा, जालना तालुक्यातील खरपुडी भागात सिडकोचा रखडलेला प्रकल्प यासह विविध विषयावर विधानसभेत आ. अर्जुनराव खोतकर यांनी प्रश्न उपस्थित करीत जालन्यातील जिव्हाळ्याच्या व ज्वलंत विषयाला वाचा फोडली.
जालना शहरात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. आजपर्यंत भटक्या कुत्र्यांनी दोन बालकांसह एका पोलिस कर्मचाऱ्यांचा बळी घेतला आहे. शहरातील प्रत्येक वार्डात भटक्या कुत्र्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. महापालीका प्रशासनाकडे विविध संघटना व राजकीय पक्षांनी निवेदन देउन व आंदोलन करुनही हा प्रश्न सुटलेला नाही. शहरात कुत्र्यांची प्रचंड दहशत असल्याने पालकांना लहान मुलांना घराबाहेर सोडता येत नाही. या मुद्द्यावर आ. खोतकर यांनी विधानसभेत सभागृहाचे लक्ष वेधले. खोतकर यांच्या या प्रश्नाची मंत्री उदय सावंत यांनी तातडीने दखल घेत महापालीकेला निर्देश दिले.
तसेच श्वानांच्या बंदोबस्तासाठी आवश्यक निधी देण्याची ग्वाही दिली. जालना शहरातील खरपुडी येथे होणारा सिडकोचा प्रकल्पा मार्गी लागावा यासाठी आ. खोतकरांनी सभागृहात प्रश्न उपस्थित करीत प्रकल्पासाठी जमीन संपादीत केलेल्या शेतकऱ्यांना प्रलंबित मोबदला तात्काळ देण्यात यावा, उर्वरीत जमीनीचे भुसंपादन तातडीने करुन रखडलेला प्रकल्पतातडीने पुर्ण करावा अशी आग्रही मागणी सभागृहात केली.
क्रिप्टो करन्सी, जेडीसीसी कॉइन तसेच विविध नागरी सहकारी बँकेतील आर्थिक गैरव्यवहार यामुळे सर्व सामान्य नागरिक व युवा वर्गाची फसवणूक होत असल्याने या प्रकाराकडेही खोतकर यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. जालना शहरात जालना मर्चण्ट, पूर्णवादी बैंक, ज्ञानराधासह इतर बँकामधे आर्थिक गैरव्यहार झाल्याने ठेवीदार अडचणीत आले आहे. खोतकर यांनी विधानसभेत हा प्रश्न उपस्थित केल्याने या ठेवीदारांना न्याय मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.
जालना शहरात वारंवार खंडीत होणाऱ्या वीज पुरवठ्याला नागरिक वैतागले आहेत. या पार्श्वभूमीवर हा प्रश्नही जालनेकरांसाठी महत्वाचा होता. हा प्रश्न सभागृहात उपस्थित करुन खोतकर यांनी खंडीत वीज प्रश्नाला वाचा फोडल्याने आता तरी महावितरण चांगली सेवा देणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.