Jalna Agriculture News : कडक उन्हामुळे खरिपाची पिके कोमेजू लागली File Photo
जालना

Jalna Agriculture News : कडक उन्हामुळे खरिपाची पिके कोमेजू लागली

घनसावंगी तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून कडक ऊन व जोरदार वाऱ्यामुळे जमिनीतील ओल झपाट्याने कमी होऊन खरिपातील कोवळी पिके कोमेजू लागली आहेत.

पुढारी वृत्तसेवा

Kharif crops have started to wilt due to the scorching heat

घनसावंगी, पुढारी वृत्तसेवा : घनसावंगी तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून कडक ऊन व जोरदार वाऱ्यामुळे जमिनीतील ओल झपाट्याने कमी होऊन खरिपातील कोवळी पिके कोमेजू लागली आहेत. आगामी तीन ते चार दिवसांत पाऊस पडला नाही तर शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळण्याची भीती आहे.

जूनच्या अखेरीस व जुलैच्या प्रारंभी पडलेल्या पावसावर घनसावंगी तालुक्यात खरीप हंगामातील बहुतांश पेरण्या पूर्ण झाल्या. सुरुवातीला समाधानकारक उगवण झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण होते.

मात्र त्यानंतर पावसाने पूर्णपणे दडी मारल्याने शेतजमिनीतील ओलावा झपाट्याने कमी होत आहे. परिणामी कापूस, सोयाबीन, तूर, मूग, उडीद आदी पिके कोमेजण्यास सुरुवात झाली असून, वेळेत पाऊस न झाल्यास तालुक्यावर दुबार पेरणीचे सावट गडद होण्याची चिन्हे आहेत. सध्या तालुक्यात दिवसभर कडक ऊन व उष्ण वाऱ्याचा जोर कायम आहे.

हलक्या जमिनीतील पिकांना सर्वाधिक फटका बसत असून अनेक ठिकाणी रोपे पिवळी पडू लागली आहेत. उगवलेले पीक टिकविण्यासाठी शेतकरी आकाशाकडे आशेने नजर लावून बसले आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे विहीर, बोअरवेल किंवा शेततळ्याचे पाणी उपलब्ध आहे, ते तुषार अथवा ठिबक सिंचनाच्या मदतीने पिकांना जीवदान देण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र पावसावरच अवलंबून असलेल्या बहुतांश शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली असून, पावसाचा खंड आणखी वाढल्यास दुबार पेरणीशिवाय पर्याय राहणार नसल्याची भीती व्यक्त होत आहे.

दुबार पेरणीची वेळ आल्यास बियाणे, खत, मशागत व मजुरीचा अतिरिक्त खर्च शेतकऱ्यांच्या खांद्यावर पडणार आहे. आधीच उत्पादन खर्चात वाढ झाल्याने आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसाठी ही परिस्थिती अधिक चिंताजनक ठरणार आहे.

घनसावंगी तालुक्यात बहुतांश शेतकऱ्यांनी पहिल्या पावसावर खरीप पिकांची पेरणी केली. मात्र पावसाने अचानक दडी मारल्याने उगवलेली पिके संकटात सापडली आहेत. अशीच परिस्थिती आणखी काही दिवस कायम राहिली, तर अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवेल. शासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवून कृषी विभागामार्फत पंचनामे, बियाणे व इतर आवश्यक मदतीची तयारी ठेवावी. शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे.
- ज्ञानेश्वर उढाण, सदस्य, युवा शेतकरी संघर्ष समिती
घनसावंगी तालुक्यात सध्या पावसाचा खंड पडल्याने खरीप पिकांवर ताण जाणवत आहे. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे त्यांनी तुषार किंवा ठिबक सिंचनाद्वारे संरक्षित पाणी द्यावे. पिकांची नियमित पाहणी करून आवश्यकतेनुसार कृषी विभागाच्या मार्गदर्शनानुसार उपाययोजना कराव्यात. शेतकऱ्यांनी घाईघाईने दुबार पेरणीचा निर्णय न घेता आगामी पावसाच्या परिस्थितीचा अंदाज घेऊन कृषी विभागाचा सल्ला घ्यावा.
डॉ. सखाराम पवळ, तालुका कृषी अधिकारी, घनसावंगी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT