Kharif crops destroyed due to rain in Jalna district
जालना, पुढारी वृत्तसेवा : जालना जिल्ह्यात पावसामुळे खरीप पिके उद्ध्वस्त झाल्याने शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चिखल झाला आहे. जिल्ह्याची वार्षिक सरासरी ६०३ मिमी असताना आजपर्यंत ७७१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. हा पाऊस वार्षिक सरासरीच्या १२८ टक्के आहे. हवामान विभागाच्यावतीने जिल्ह्याला शनिवारी रेडअलर्टचा इशारा देण्यात आल्यानंतर दिवसभरात काही भागात मध्यम ते हलक्या स्वरुपाचा पाऊस पडला.
जालना जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने धुमाकुळ घातला आहेअनेक भागात खरीपातील सोयाबीन, तूर, कापूस, मकासह इतर पिके पावसामुळे पाण्याखाली आहेत. जिल्ह्यातील सर्व प्रमुख नद्यांना मोठे पूर आल्याने नद्या दुथडी भरून वाहात आहेत. विहिरी, तलाव भरले असून सर्वत्र पाणीच पाणी दिसून येत आहे. जिल्ह्यात घनसावंगी तालुक्यात सर्वाधिक ९१६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. शनिवारी हवामान विभागाच्यावतीने जालना जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आल्याने नागरीकासह शेतकरी प्रचंड धास्तावले होते.
मात्र दिवसभरात काही भागात मध्यम तर काही भागात रिमझिम पाऊस पडल्याने नद्यांना मोठे पूर आले नाहीत. जिल्ह्यात खरीप हंगामातील पिके उद्ध्वस्त झाल्याने पंचनामे न करता सरसगट नुकसान भरपाई करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत. मंठा तालुक्यात महसूलच्यावतीने पंचनामे करण्यात न आल्याने शेतकऱ्यांमधे रोष आहे. गेल्या पंचवीस वर्षात झाला नव्हता असा पाऊस यावर्षी पडल्याचे जाणकार सांगत आहेत.
महसूलच्यावतीने गावा-गावात नुकसानीचे फोटो काढून पंचनामे करण्याचे सोपस्कार पुर्ण केले जात आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री पंकजा मुंडे, उद्ययोगमंत्री उदय सावंत, शिवसेना उबाठा पक्षाचे पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधींनी नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. नुकसानीची पाहणी करण्याऐवजी अडचणीतील शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा हात देण्याची मागणी शेतकऱ्यांतून होताना दिसत आहे.
जिल्ह्यात पावसाच्या रेडअलर्टच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. शहरात नदीकाठच्या नागरिकांचे स्थलांतर करण्यात येत आहे. रिक्षा व इतर वाहनांवरून ध्वनिक्षेपकांवर नागरिकांना आवाहन केले जात आहे.