Kharif crops depend on light, steady rain
घनसावंगी, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यात यंदाच्या पावसाळ्याला सुरुवात होऊन एक महिना उलटला असला तरी अद्याप दमदार पावसाने हजेरी लावलेली नाही. जून महिन्यात अधूनमधून झालेल्या रिमझिम व हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसावरच शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पेरण्या पूर्ण केल्या आहेत. सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, बाजरी यांसह विविध पिकांची उगवण समाधानकारक झाली असली तरी पिकांच्या जोमदार वाढीसाठी आवश्यक असलेला सलग आणि मुसळधार पाऊस न झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत.
जुलैचा पहिला आठवडा संपत आला तरी पावसाने अपेक्षित जोर धरलेला नाही. सुरुवातीच्या पावसामुळे शेतांमध्ये हिरवाई दिसत असली तरी जमिनीच्या वरच्या थरापुरताच ओलावा टिकून आहे. खोलवर माती कोरडी असल्याने पिकांच्या मुळांची वाढ मर्यादित होत असून पुढील काही दिवस पाऊस लांबल्यास पिकांवर ताण येण्याची शक्यता जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे. तालुक्यातील लघु व मोठे तलाव, शेततळी, बंधारे, पाझर तलाव, ओढे आणि नाले जुलै महिन्यातही बहुतांश ठिकाणी कोरडेच आहेत. दरवर्षी या काळात वाहणारे ओढे-नाले यंदा शांत असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांमध्येही चिंतेचे वातावरण आहे.
अनेक तलावांच्या तळाशी मोठ्या भेगा पडल्या असून जलसाठ्यात कोणतीही लक्षणीय वाढ झालेली नाही. त्यामुळे पावसाळ्याच्या मध्यावरही उन्हाळ्यासारखे चित्र कायम आहे. भूजल पातळीतही अपेक्षित वाढ झालेली नसल्याने अनेक विहिरी आणि बोअरवेलमधील पाणीसाठा मर्यादित आहे. यामुळे भविष्यात सिंचनाबरोबरच पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेषतः पावसावर अवलंबून असलेल्या गावांमध्ये ही चिंता अधिक तीव्र होत आहे. जनावरांसाठी पाण्याची उपलब्धता कमी होते.
जुलै महिना सुरू झाला तरी अनेक भागांतील ओढे, नाले आणि तलाव कोरडेच आहेत, ही अत्यंत चिंतेची बाब आहे. रिमझिम पावसामुळे केवळ पेरण्या झाल्या असल्या तरी शेतीला आणि जलसाठ्यांना दमदार पावसाची नितांत गरज आहे. अशीच परिस्थिती कायम राहिली तर खरीप हंगामासह पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर होऊ शकतो. आता सर्वांच्या नजरा जोरदार पावसाकडे लागल्या आहेत."- ज्ञानेश्वर पवार, शेतकरी बोलेगाव