Kharif crop awaits rains at Jalna
जालना, पुढारी वृत्तसेवाः जालना जिल्ह्यातील खरीपाच्या ६ लाख ५१ हजार १७४ हेक्टर क्षेत्रापैकी ५ लाख ७३ हजार ७१० हेक्टर क्षेत्रावर म्हणजेच ८८ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. पेरणीनंतर मोठे पाऊस नसल्याने जिल्ह्यातील परिस्थिती गंभीर आहे. पावणेसहा लाख हेक्टरवरील पिकाला पावसाची प्रतिक्षा असल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यात खरीप हंगामाच्या सुरवातीलाच काही भागात समाधानकारक पाऊस झाल्याने खरीप पिकांचा टक्का वाढण्याचा अंदाज आहे. जिल्ह्यातील आठही तालुक्यांत सरासरी क्षेत्राच्या तुलनेत ५ लाख ३२ हजार ७७३ हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली आहे.
पेरणीनंतर पावसाने दडी मारल्याने खरीपातील कोवळ्या पिकांची वाढ खुंटली आहे. आतापर्यंतचा पेरणी टक्का ८२ टक्के एवढा झाला आहे. दरम्यान, जिल्ह्यात सरासरी क्षेत्राच्या तुलनेत सोयाबीनचे क्षेत्र वाढले आहे. जिल्ह्यातील अंबड, घनसावंगी, परतूर, मंठा, जालना, बदनापूर, भोकरदन आणि जाफराबाद या आठ तालुक्यांत खरीप पिकांचे सर्वसाधारण क्षेत्र सहा लाख ५१ हजार १७४ हेक्टर आहे.
असे असताना आतापर्यंत ५ लाख ३२ हजार ७७३ हेक्टरवर पेरणी झाली असतांनाच पाऊस पडल्यास जुलै अखेरपर्यंत पेरणी क्षेत्र वाढणार आहे. दरम्यान, जिल्ह्यात सोयाबीनच्या सरासरी क्षेत्रात १ लाख ८१ हजार ५७५ असताना आता वाढ होऊन १ लाख ९० हजार ११४ हेक्टर एवढे झाले आहे. जिल्ह्यात सर्वाधिक खरीपाची पेरणी जालना तालुक्यात ९३.८२ टक्के झाली आहे. भोकरदन तालुक्यामध्ये सर्वात कमी ७० टक्के पेरणी झाली आहे.
जिल्ह्यात मुग १२ हजार ९००, उडीद ६हजार ३०५, कापुस २ लाख ६३ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. खरीप हंगामात भरपुर पाऊस पडणार असल्याचाअंदाज हवामान विभगाने वर्तविल्याने शेतकऱ्यांनी रिमझीम पावसावर झटपट पेरणी उरकली. मात्र कोवळी पिके शेतात डौलत असतांनाच पावसाने दडी मारल्याने शेतकरी हैराण झाला आहे. अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली आहे. आगामी आठ दिवसात चांगला पाऊस न पडल्यास खरीपाचे पिक धोक्यात येण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात तालुकानिहाय आजपर्यंत झालेली पेरणी : भोकरदन ७१ हजार ६५९ हेक्टर, जाफराबाद ५१ हजार ७१७ हेक्टर, जालना ८६ हजार ५८३ हेक्टर, अंबड ७४ हजार १७५ हेक्टर, परतूर ५५ हजार १३८ हेक्टर, बदनापूर ५३ हजार २९५ हेक्टर, घनसावंगी ८१ हजार ५०७हेक्टर, मंठा ५८ हजार ६९९ हेक्टर