Kasura river floods, Partur-Ashti road closed
आष्टी, पुढारी वृत्तसेवा परतूर तालुक्यातील आष्टी व परिसरात १४ रोजी रात्री पासून सुरू असलेल्या पावसामुळे शेगाव -पंढरपूर महामार्गावरील श्रेष्टी येथील कसुरा नदीला पूर आला. यामुळे जुन्या पुलावरून वाहिल्याने परतूर- आष्टी-माजलगाव हा महामार्ग पूर्णपणे बंद झाला होता. यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली.
आष्टी परिसरात पडत असलेल्या पावसामुळे श्रेष्टी येथील कसुरा नदीला पूर आला आहे. या नदीवर नवीन पुलाचे काम गेल्या काही वर्षांपासून कासव गतीने सुरू असल्याने जुन्या पुलावरुन वाहतूक सुरू आहे. जुन्या पुलाची उंची कमी असल्याने कसुरा नदीला पूर आल्यास हे पाणी पुलावरून वाहते.
त्यामुळे परतूर-आष्टी माजलगाव हा मार्ग वेळोवेळी बंद होतो. पुलावरुन पाणी वाहत असतांना अनेकदा जुन्या पुलावरून पाणी वाहात असतांना वाहन चालकांनी वाहने नेल्याने काही वर्षांपूर्वी या पुलांवर दोन ते तीन वेळा अपघाताचे प्रकार घडले होते.
तेव्हा पासून नदीवरील जुन्या पुलावरून पाणी वाहत असतांना वाहनचालक पाण्यातून वाहने नेण्याचा धोका पत्करत नाहीत. शेगाव- पंढरपूर महामार्गाचे सिमेंटच्या रस्त्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. मात्र गेल्या दहा वर्षांपासून श्रेष्टी येथील नवीन पुलांचे काम रखडले आहे.