काँग्रेस पक्षाचे नेते माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचा काँग्रेस पक्षाच्या उपाध्यक्षपदाचा राजीनामा
उद्या (दि.31 जुलै) मुंबई येथील भाजपा प्रदेश कार्यालयात भाजपामधे प्रवेश करणार
जालना विधानसभा मतदार संघातून काँग्रेसच्या तिकीटावर तीन वेळेस निवडून आले होते
जालना : काँग्रेस पक्षाचे नेते माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी मंगळवारी (दि.29) त्यांच्या पक्ष सदस्यांसह काँग्रेस पक्षाच्या उपाध्यक्षपदाचा राजीनामा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षर्धन सपकाळ यांच्याकडे पाठविला आहे.
गेल्या अनेक दिवसापासून गोरंट्याल हे काँग्रेस पक्षावर नाराज होते. मागील काही दिवसापासून ते भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चाही जोर धरत होती.त्यानुसार मंगळवारी त्यांनी पक्ष सदस्यत्व आणि पदाचा राजीनामा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे पाठविला आहे. गुरुवार, दि. 31 जुलै रोजी गोरंट्याल हे मुंबई येथील भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित कार्यक्रमात भाजपामधे प्रवेश करणार आहेत. मंगळवारी (दि.29) गोरंट्याल यांच्या निवासस्थानी गोरंट्याल यांच्या समर्थकांची बैठक घेण्यात आली. यावेळी किती जण भाजपामधे जाणार याची चाचपणी करण्यात आली.
गोंरट्याल यांच्या सोबत अनेक जिल्हा परिषद, पंचायत समीती, महापालिकेचे माजी सदस्य हे सुध्दा भाजपात प्रवेश करणार असल्याने जालना विधानसभा मतदारसंघात भाजपाची ताकद वाढणार आहे. गोरंट्याल हे जालना विधानसभा मतदार संघातून काँग्रेसच्या तिकीटावर 1999, 2009 व 2019 अशा तीन वेळेस निवडून गेले आहेत. त्यांच्या ताब्यात अनेक वर्ष जालना नगरपालिका होती.
गोंरट्याल यांना मानणारा मोठा वर्ग जालना मतदार संघात असल्याने गोरंट्याल यांच्या भाजपा प्रवेशामुळे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपाचे बळ वाढणार असल्याचा अंदाज आहे. गोरंट्याल यांच्यापूर्वी माजी आ.सुरेशकुमार जेथलिया यांनीही काँग्रेसला काही महिन्यापूर्वी सोडचिठ्ठी दिली होती. जालना जिल्हयात खासदार कल्याण काळे वगळता एकही मोठा नेता राहिला नसल्याने काँग्रेसची जिल्ह्यातील अवस्था बिकट बनली आहे. दरम्यान गोरंट्याल यांचे भाजपातील स्थानिक नेते कशा प्रकारे स्वागत करतात याकडेही सर्वांचे लक्ष राहणार आहे.
गोरंट्याल यांना आगामी जिल्हा परिषद, मनपा निवडणुका लक्षात घेत भाजपमध्ये घेतले जाणार असल्याची चर्चा आहे. जालना जिल्ह्याचा विचार करता गोरंट्याल यांचा प्रदेश स्तरावरही मोठा दबदबा होता. जालना शहर आणि जिल्ह्यातही त्यांचा वरचष्मा होता. त्यामुळे त्यांच्या राजीनामा काँग्रेस पक्षासाठी धक्का असल्याचे मानले जाते. राजकीय निरीक्षकांच्या मते पाच वर्षानंतर होणार्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर घेत भाजपने इनकमिंग सुरू केले आहे. बाहेरील नेते पक्षात येत असल्याने निष्ठावान कार्यकर्त्यांची मात्र गोची होण्याची शक्यता असल्याचे बोलले जाते.