Marathwada Politics : मराठवाड्यात काँग्रेसला खिंडार

वरपुडकरांचा भाजप प्रवेश, गोरंट्यालांचाही राजीनामा
Marathwada Politics
मराठवाड्यात काँग्रेसला खिंडारPudhari News Network
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्ष सोडल्यानंतर परभणीचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष, माजी मंत्री सुरेश वरपुडकर यांनीही मंगळवारी (दि.29) भाजपमध्ये प्रवेश केला. जालन्याचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी पक्षाचा राजीनामा देत भाजपत जाण्याचे ठरविल्याने मराठवाड्यात काँग्रेसला मोठे खिंडार पडले आहे.

आगामी स्थानिक स्वशान संस्थांच्या निवडणुका पाहता या दोन्ही नेत्यांचा पक्षत्याग काँग्रेसला धक्का देणारा ठरला आहे. वरपुडकर हे चार वेळा आमदार, एक वेळा खासदार होते. याशिवाय जिल्हा बँकेवर त्यांचे निर्विवाद वर्चस्व राहिले आहे. मागील चार दशकापासून जिल्ह्याच्या राजकारण, समाजकारणात ठसा उमटविणारे वरपुडकर म्हणजे जिल्ह्याच्या राजकारणातील वलयांकीत नेतृत्व होय. विद्यार्थी दशेपासूनच विविध आंदोलनाच्या माध्यमातून सुरेश वरपुडकरांचे नेतृत्व विकसीत होत गेले. परभणी जिल्ह्यात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. मंगळवारी मुंबईत त्यांचा भाजप कार्यालयात पक्ष प्रवेश सोहळा झाला, तेव्हा झालेल्या गर्दीमुळे भाजप नेतेही चकित झाल्याचे सांगितले जाते. या प्रवेशाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वागत केले.

गोरंट्याल यांनी घेतली बैठक

दुसरीकडे जालन्याचे काँग्रेस नेते, माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी पक्षाचा रितसर राजीनामा प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना पाठविला आहे. त्यांनी मंगळवारी समर्थकांची जालन्यात बैठक घेतली. गोरंट्याल हे येत्या 31 तारखेला भाजपमध्ये जाणार असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले. त्यांचा प्रवेश सोहळा मुंबईतच होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news