जालना ः कदीम जालना पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत चोरीच्या पाच दुचाकी जप्त करून एका आरोपीला शुक्रवार, दि. 8 रोजी अटक केली आहे. या कारवाईत तब्बल 1 लाख 55 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुना जालना परिसरातील जांगडे पेट्रोलपंपाजवळ चोरीच्या मोटारसायकली विक्रीसाठी आणल्या जाणार असल्याची गोपनीय माहिती कदीम जालना पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी जीवन वसाहत परिसरात सापळा रचला.
यावेळी संशयित रविंद्र आनंद सिंह (वय 38, रा. खुफ्लानंद नगर, जीवन वसाहत, जुना जालना) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने आणखी चार दुचाकी लपवून ठेवल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून एकूण पाच मोटारसायकली जप्त केल्या.
जप्त करण्यात आलेल्या वाहनांमध्ये होंडा शाईन, एचएफ डिलक्स, हिरो होंडा पॅशन, सीडी डॉन आणि कावासाकी कंपनीच्या दुचाकींचा समावेश आहे. यापैकी एका दुचाकीचा संबंध अंबड पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याशी असल्याचे तपासात समोर आले आहे.