जालना : शहरातील जुना जालना भागात घरफोडीच्या गुन्ह्यात दोन संशयितांना अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या संशयितासह पोलिस अधिकारी व कर्मचारी.  pudhari photo
जालना

Jalna Crime: घडफोडी करणारे दोन संशयित जेरबंद

कदिम जालना पोलिसांची कारवाई, ५० हजारांचा मुद्देमाल जप्त

पुढारी वृत्तसेवा

जालना : येथील कदिम जालना पोलिसांनी घरफोडी व चोरीच्या गुन्ह्यात दोन संशयीत आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून चोरीस गेलेला सुमारे ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

शहरातील जुना जालना भागात १४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास फिर्यादी हे जुन्या घरात सामान आणण्यासाठी गेले असता घरातील सामान व्यवस्थित होते. मात्र, १५ ऑक्टोबर रोजी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास साक्षीदाराने जुन्या घराचे कुलूप तोडल्याची माहिती दिली. त्यानंतर फिर्यादींनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता घराचे कुलूप तोडून घरातील साहित्य चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. यामध्ये शिवणयंत्र, पितळी समई, सायकल, पाण्याची मोटारपंप व इतर साहित्याचा समावेश होता.

या प्रकरणी कदिम जालना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास जमादार खलील बेग यांच्याकडे सोपविण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन दोन तपास पथके तयार करून अज्ञात आरोपींचा शोध घेण्याचे आदेश देण्यात आले होते. तपास पथकांनी गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने तपास केला.

यामध्ये संशयीत सचिन बाबुराव गायकवाड (वय २४, रा. कैकाडी मोहल्ला, जुना जालना) व रामेश्वर भगवान गायकवाड (वय २६, रा. जामा मस्जिद, मोरंडी मोहल्ला, जुना जालना) या दोघांचा गुन्ह्यात सहभाग असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांच्याकडून चोरीस गेलेला ५० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

यांची कारवाई

ही कारवाई पोलिस अधीक्षक तेगबीरसिंग संधू, अपर पोलिस अधीक्षक विक्रम साळी व उपविभागीय पोलिस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक जे. बी. शेवाळे , जमादार सचिन चौधरी, सदा राठोड, धनाजी कावळे, खलील बेग, पोलिस कर्मचारी मतीन शेख, इम्रान खान, दिलीप गायकवाड व विलास बोराडे यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT