जामखेडचे तलाठी कार्यालय कुलूप बंद file photo
जालना

जामखेडचे तलाठी कार्यालय कुलूप बंद

भेटीच्या दिवशीही तलाठी फिरकेनात, महसूल विभागाची कामे रखडली, वरिष्ठांनी लक्ष घालण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

Jamkhed Talathi office locked

जामखेड, पुढारी वृत्तसेवा : अंबड तालुक्यातील जामखेड परिसरातील शेतकरी दुष्काळी परिस्थितीशी झुंज देत असून त्यांना शासकीय मदतीची आणि महसूल विभागाच्या सहकार्याची नितांत गरज आहे. मात्र दुसरीकडे गावातील महसूल कार्यालयाला कुलूप, तलाठी आणि मंडळ अधिकारी गावात नियमित फिरकत नसल्याच्या तक्रारींमुळे महसूल यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, गुरुवार (दि.१९) सकाळी ११ वाजून ५१ मिनिटांनी प्रत्यक्ष पाहणी केली असता मंडळ अधिकारी कार्यालय, विभाग जामखेड तसेच ग्राम महसूल अधिकारी सज्जा जामखेड कार्यालय बंद असल्याचे निदर्शनास आले. या परिस्थितीचे तारीख व वेळेसह छायाचित्रणही करण्यात आले आहे. त्यामुळे जामखेडच्या महसूल विभागाचा कारभार आता नागरिकांच्या तक्रारींपुरता मर्यादित न राहता प्रत्यक्ष पाहणीतूनही चर्चेत आला आहे.

शासनाने सर्वसामान्य नागरिकांना गावपातळीवर महसुली सेवा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी तलाठी आणि मंडळ अधिकारी कार्यालयांची व्यवस्था केली आहे. जामखेड परिसरातील शेतकऱ्यांना सातबारा उतारा, फेरफार नोंदी, वारस नोंदी, जमीनविषयक कागदपत्रे, विविध दाखले तसेच अन्य महसुली कामांसाठी या कार्यालयांशी संपर्क साधावा लागतो. मात्र स्थानिक कार्यालय बंद असल्याच्या तक्रारींमुळे नागरिकांना आपल्या कामासाठी थेट अंबड येथे जावे लागत आहे. गावात शासकीय कार्यालय असूनही कामासाठी तालुक्याच्या ठिकाणी हेलपाटे मारावे लागत असतील, तर गावपातळीवरील महसूल यंत्रणेचा उपयोग काय? शासनाने नागरिकांच्या सोयीसाठी उभारलेली व्यवस्था प्रत्यक्षात नागरिकांसाठी उपलब्ध आहे की केवळ कागदावरच, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

येथील मंडळ कार्यालयात ग्रामस्थांना भेटण्यासाठी आठवड्यातून दोन दिवस देण्यात आले. त्या दिवशीही संबंधित अधिकारी उपस्थित राहत नसल्याने ग्रामस्थातून संताप व्यक्त होत आहे. सध्या शेतकरी दुष्काळी परिस्थितीचा सामना करत असून पावसाअभावी पिकांचे नुकसान, आर्थिक अडचणी आणि आगामी हंगामाची चिंता अशा संकटात सापडला आहे.

अशा कठीण काळात शेतकऱ्यांसाठी तलाठी आणि मंडळ अधिकारी हे महसूल प्रशासनातील महत्त्वाचे दुवे आहेत. पीक नुकसान पंचनामे, पीक नोंदी, ई-पीक पाहणी, दुष्काळी मदत, शासकीय अनुदान आणि विविध महसुली दाखल्यांसाठी या अधिकाऱ्यांची भूमिका महत्त्वाची असते. मात्र गावात अधिकारीच उपलब्ध नसतील आणि कार्यालय बंद असेल, तर शेतकऱ्यांनी आपल्या अडचणी मांडायच्या कुणाकडे? दुष्काळाने आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठीही हेलपाटे मारावे लागणार असतील, तर ही बाब चिंताजनक आहे. संकटाच्या काळात शेतकऱ्यांना महसूल विभागाकडून वेळेत मदत आणि मार्गदर्शन मिळणे अपेक्षित असताना कार्यालयीन उपलब्धतेबाबतच प्रश्न निर्माण होत आहेत.

ठरवून दिलेल्या दिवशीही कार्यालय बंद

मंडळ अधिकारी कार्यालयात महसूल कामासंदर्भात तलाठी यांना भेटण्यासाठी आठवड्यातून सोमवार व गुरुवार हे दिवस ठरवून देण्यात आले आहे. संबंधित अधिकारी ठरवून दिलेल्या दिवशीही कार्यालयात येत नाही. यामुळे शेतकरी व ग्रामस्थांना तालुक्याच्या ठिकाणी जावे लागते. संबंधित अधिकारी यांना नियमित कार्यालयात उपस्थित राहण्याचे आदेश देण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. दुष्काळी परिस्थितीत शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत असताना महसूल यंत्रणेची अशी अवस्था असेल, तर सामान्य नागरिकांनी दाद मागायची कुणाकडे, असा प्रश्न उपस्थितीत होतो.

तहसीलदारांनी प्रत्यक्ष पाहणी करावी

या संपूर्ण प्रकाराची तहसीलदार तसेच वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घेण्याची गरज आहे. जामखेड येथील तलाठी आणि मंडळ अधिकारी कार्यालयांची अचानक पाहणी करावी. कार्यालयीन वेळेत अधिकारी व कर्मचारी उपस्थित असतात का, कार्यालय नियमित सुरू असते का, तलाठी मुख्यालयी उपलब्ध असतात का, मंडळ अधिकारी गावाला किती भेटी देतात, याची तपासणी करावी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT