जालना

Jalna accident: जामखेड येथील रोहिलागड फाटा पुन्हा ठरला अपघाताचा सापळा; आमदारांच्या वाहनाचा अपघात

या अपघातात वाहनाच्या समोरील व पाठीमागील भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे

पुढारी वृत्तसेवा

विलास बा. जाधव

जामखेड : अंबड तालुक्यातील जामखेड येथील रोहिलागड फाटा पुन्हा एकदा भीषण अपघातामुळे चर्चेत आला आहे. बदनापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार नारायण कुचे यांच्या वापरातील एमएच 21 बीएफ 5200 क्रमांकाच्या वाहनाचा सोमवार (दि. 20 जुलै) रोजी पहाटे सुमारे 4.45 वाजण्याच्या सुमारास रोहिलागड फाट्यावरून बदनापूरकडे जात असताना भीषण अपघात झाला. सुदैवाने या वाहनात आमदार नारायण कुचे नव्हते. वाहनात त्यांचे बॉडीगार्ड, पीए आणि एक नातेवाईक प्रवास करत होते. अपघातात ते जखमी झाले असून कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, आमदार नारायण कुचे यांचा ताफा छत्रपती संभाजीनगरहून पंढरपूरच्या दिशेने निघाला होता. दरम्यान, त्यांच्या सहकाऱ्याच्या कुटुंबीयांना बदनापूर येथून घेण्यासाठी एक वाहन जामखेड फाट्यावरून बदनापूरकडे पाठविण्यात आले होते. याच वाहनाचा जामखेड येथील रोहिलागड फाट्यावर अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच आमदार नारायण कुचे आणि त्यांचे कार्यकर्ते तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना वाहनातून बाहेर काढून तत्काळ जालना येथील रुग्णालयात उपचारासाठी रवाना केले. या अपघातात वाहनाच्या समोरील व पाठीमागील भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

जामखेड येथील रोहिलागड फाटा हा गेल्या सहा ते सात वर्षांपासून अपघातप्रवण ठिकाण म्हणून ओळखला जात आहे. येथे तीव्र वळण, अपुरे दिशादर्शक फलक, गतीरोधकांचा अभाव तसेच रात्रीच्या वेळी अपुरी सुरक्षा व्यवस्था यामुळे वारंवार अपघात घडत आहेत. स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार, या ठिकाणी एक-दोन दिवसाआड लहान-मोठे अपघात होत असून, यापूर्वी अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

या धोकादायक ठिकाणी सुरक्षा उपाययोजना करण्यासाठी पत्रकार म्हणून यापूर्वी अनेक वेळा वृत्तपत्रातून गतीरोधक, दिशादर्शक फलक, रिफ्लेक्टर आणि अन्य सुरक्षाविषयक उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, संबंधित विभागाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

विशेष म्हणजे, याच मतदारसंघाचे आमदार नारायण कुचे यांच्या वापरातील वाहनालाच या अपघातप्रवण ठिकाणी अपघात झाल्याने रोहिलागड फाट्यावरील रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. वारंवार होणारे अपघात आणि अनेकांचे बळी गेल्यानंतरही आवश्यक उपाययोजना न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

आता स्वतः आमदारांच्या वापरातील वाहनालाच या अपघातप्रवण ठिकाणी अपघात झाल्याने संबंधित विभाग आणि लोकप्रतिनिधी या गंभीर प्रश्नाची कितपत दखल घेणार, तसेच गतीरोधक, दिशादर्शक फलक, रिफ्लेक्टर, इशारा दिवे व इतर आवश्यक सुरक्षा उपाययोजना तातडीने करण्यात येणार का, याकडे जामखेड परिसरातील ग्रामस्थांसह संपूर्ण बदनापूर विधानसभा मतदारसंघाचे लक्ष लागून आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT