jalna zp Chief Executive Officer Minnu P. M.
जालना, पुढारी वृत्तसेवा : दीर्घकाळ टीकेचे धनी ठरलेल्या जालना जिल्हा परिषदेच्या कारभारात आता शिस्त, पारदर्शकता आणि गतिमानता यांचे नवे वारे वाहू लागले आहेत. हे परिवर्तन घडवून आणले आहे, नुकत्याच कार्यभार स्वीकारलेल्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी. एम. यांनी, कार्यालयीन अनागोंदीला आळा, शिस्तीला चालना देण्यासाठी सर्वप्रथम त्यांनी सर्व प्रथम आढावा बैठकांचा धडाका लावला.
मनमानी, फाईलींची दिरंगाई, आणि स्वच्छतेचा अभाव यामुळे जिल्हा परिषदेची प्रतिमा गेल्या अनेक वर्षांपासून मलीन होत चालली होती. मात्र, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारताच पहिल्या टप्प्यात कार्यालयीन शिस्त, उपस्थिती आणि स्वच्छता यावर लक्ष केंद्रीत करत दंडात्मक परिपत्रक जारी केले.
कोणत्याही कार्यालयात शिस्तभंग किंवा स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन झाल्यास, त्या कार्यालय प्रमुखांवर थेट ५ हजार रुपयांचा दंड आकारण्यात येईल, असा स्पष्ट इशारा या परिपत्रकात देण्यात आला आहे. कामात गती आणण्यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळेचे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे.
त्यामुळे प्रलंबित कामांचा निपटारा लवकर करण्यासाठी शनिवार आणि रविवारसुद्धा कार्यालय सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे कामकाजातील दिरंगाईला आता आळा बसणार आहे.
या उपाययोजनांमुळे जालना जिल्हा परिषदेच्या कार्यालयीन वातावरणात लक्षणीय सकारात्मक बदल दिसून येत असून, स्वच्छता, टापटीप, वेळेचे भान आणि जवाबदारीची जाणीव यामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. नागरिक, जनप्रतिनिधी आणि कर्मचारी वर्गामध्येही या बदलाबद्दल समाधानाचे सूर ऐकू येत आहेत.
मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी. एम. यांच्या शिस्तीच्या आणि सहभागात्मक नेतृत्वाच्या कार्यशैलीचा हा प्रत्यक्ष परिणाम आहे, असे प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचेही मत आहे.
स्वतः पुढाकार घेत 'श्रमदान'
२९ जुलै रोजी सीईओ मिन्नू पी. एम. यांनी सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन जिल्हा परिषद परिसरात श्रमदान करून 'स्वच्छता मोहिमेचा' शुभारंभकेला. या कृतीतून त्यांनी 'आदेश फक्त फाईलवर नव्हे, तर कृतीतही उतरावे' हे उदाहरण घालून दिले.