जालना : जालना कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवार, ९ रोजी झालेल्या लिलावात पांढऱ्या तुरीला १० हजार ६५० रुपये इतका या हंगामातील उच्चांकी कमाल दर मिळाला.
बाजारात विविध शेतमालाची मोठी आवक पाहायला मिळाली असून बाजारात एकाच दिवसात ६ कोटी ५ लाख १७ हजार ४४८ रुपये किमतीची भरघोस उलाढाल झाली आहे. आजच्या लिलावात पिवळ्या सोयाबीनची तब्बल ७,९६७ क्विंटल एवढी विक्रमी आवक झाली असून त्याला सर्वसाधारण ६,५०० रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. तर दुसरीकडे, पांढऱ्या तुरीला १०,६५० रुपये असा या हंगामातील उच्चांकी कमाल दर मिळाला आहे.
बाजार समितीने प्रसिद्ध केलेल्या दैनंदिन आढाव्यानुसार, बाजारात एकूण ९,९४९ क्विंटल शेतमालाची आवक झाली. यामध्ये सर्वाधिक वाटा पिवळ्या सोयाबीनचा राहिला. कडधान्यांमध्ये पांढऱ्या तुरीला किमान ६,०११ रु., कमाल १०,६५० रु. आणि सर्वसाधारण ९,५०० रु. दर मिळाला.
काळ्या उडदाला ९,६०० रुपये कमाल भाव मिळाला, तर चमकी मुगाची ३७ क्विंटल आवक होऊन त्याला कमाल ९,४०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला आहे. गावरान हरभऱ्याला ७,४०० रुपयांपर्यंतचा दर लाभला. धान्य वर्गात शाळू ज्वारीला बाजारात चांगली मागणी दिसून आली. ५९६ क्विंटल आवक झालेल्या शाळू ज्वारीला कमाल ६,८०० रुपये भाव मिळाला.