थंडीची चाहूल लागताच उबदार कपडे खरेदीस नागरिकांची गर्दी.  (छाया - रमाकांत बन्सोड)
जालना

Jalna Weather Update : गंगापूर तालुक्यात थंडीची चाहूल, तापमानात झपाट्याने घट

उबदार कपडे खरेदीसाठी दुकानात नागरिकांची गर्दी, शेकोट्या पेटू लागल्या

पुढारी वृत्तसेवा

गंगापूर (जालना): लांबत गेलेल्या पावसामुळे दिवाळीनंतरही पाऊस कोसळला, आणखी पाऊस पडतो की काय अशी चिंता असलेल्या शेतकऱ्यांनी आता ती मागे टाकत रब्बी हंगामाच्या तयारीस गती दिली आहे. दोन- तीन दिवसांपासून हवामानात अचानक बदल जाणवू लागला असून, किमान तापमानात झपाट्याने घट होत आहे. परिणामी गंगापूरसह संपूर्ण जिल्ह्यात बोचऱ्या थंडीचे आगमन झाले आहे.

शहरासह ग्रामीण भागातही सकाळी आणि रात्रीच्या सुमारास गारठा जाणवत असून, नागरिकांनी आता उबदार कपड्यांचा आधार घेण्यास सुरुवात केली आहे. बाजार-पेठांमध्ये स्वेटर, जॅकेट, मफलर, टोपी आदी उबदार कपड्यांच्या खरेदीसाठी गर्दी वाढली आहे. व्यापाऱ्यांच्या मते, गेल्या आठवड्यापासूनच थंडीचा जोर वाढू लागल्याने विक्रीत चांगलीच वाढ दिसून येत आहे. दरवर्षी सप्टेंबरअखेरपर्यंत मान्सून परतीच्या मार्गाला लागतो आणि महाराष्ट्रातून तो साधारणपणे १० ते १५ ऑक्टोबरदरम्यान निघून जातो. मात्र यंदा मान्सूनने तब्बल महिनाभर उशिरा म्हणजे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात राज्यातून माघार घेतली. त्यामुळे ऑक्टोबर महिनाभर गंगापूर तालुक्यात व जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहिला. दिवाळीच्या काळातही हवेत आद्रतेचे प्रमाण जास्त असल्याने थंडीला प्रवेश करता आला नाही. दरम्यान, गंगापूरसह जिल्ह्यातील शेतकरी वर्गाने आता रब्बी पिकांच्या लागवडीसाठी तयारी सुरू केली आहे. ओलसर जमिनीमुळे पेरणीस अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून शेतांमध्ये पुन्हा हालचाल सुरू झाली आहे. गेल्या काही वर्षांपासून हिवाळ्याचा कालावधी कमी होत असला तरी यंदाच्या उशिरा परतलेल्या मान्सूननंतरची थंडी मात्र तीव्रतेने जाणवत असल्याचे नागरिकांचे मत आहे. शहरातील चहा टपऱ्या, कँटीनमध्येही पहाटेपासून गर्दी वाढली असून, गरमागरम चहासोबत निवडणूक गप्पांचा सिलसिला रंगत आहे,

थंडीत वाढ होणार

आता मात्र मान्सून पूर्णतः परतल्याने हवामानात बदल होऊन थंडीचा हंगाम सुरू झाला आहे. सकाळच्या धुक्याने आणि रात्रीच्या गारव्याने हिवाळ्याची चाहूल लागली आहे. दिवसभर तापमानात फारसा फरक नसला तरी सकाळी व रात्री बोचरा गारवा अनुभवास येतो. उत्तर-पूर्वेकडून वाहणारे कोरडे वारे आणि स्वच्छ आकाश यामुळे पुढील काही दिवसांत थंडीत आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT