जालना : यंदा उन्हाळ्याची दाहकता दिवसेंदिवस वाढत आहे. जालना जिल्ह्यावर पाणीटंचाईचे मोठे संकट उभे राहणार आहे. त्यामुळे या संकटाशी सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सुमारे 561 गावे आणि 140 वाड्यावस्त्यांसाठी 16 कोटी 49 लाखांचा पाणी टंचाई निवारण आराखडा तयार केला आहे.
दरम्यान, जालना जिल्ह्यातील 57 लघू आणि 7 मध्यम प्रकल्पाची पातळी देखील झपाट्याने कमी होत आहे. गतवर्षी काही भागांत अतिवृष्टी झाली तरी यंदा जानेवारी ते जून 2026 या काळात जिल्ह्यातील 561 गावे आणि 140 वाहनांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने, भूजल सर्वेक्षण यंत्रणेसोबत मिळून हा आराखडा तयार केला. भूजल पातळी खालावल्याने आणि भविष्यातील पाण्याची मागणी लक्षात घेता हा आराखडा अंतिम मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आला आहे.
गतवर्षी ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये घनसांगवी, अंबड, परतूर, मंठा या तालुक्यांत पावसाने दमदार हजेरी लावली होती. मात्र जालना, बदनापूर, भोकरदन, जाफराबाद या तालुक्यांत पाण्याची स्थिती अजूनही गंभीर आहे. 2023 च्या दुष्काळाचा अनुभव लक्षात घेता प्रशासनाने फेब्रुवारीपासूनच मोठ्या प्रमाणात टँकर तैनात करण्याची तयारी केली आहे.
आराखड्याची वैशिष्ट्ये :
टंचाई निवारणासाठी काही गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा, विहीर अधिग्रहण, नळ योजनांची दुरुस्ती आदी कामे हाती घेतली जाणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मंजुरी मिळाल्यानंतरच प्रत्यक्षात कामाला सुरुवात होणार आहे.