Jalna Water Shortage  pudhari photo
जालना

Jalna Water Shortage : पिण्याच्या पाण्याचा काटकसरीने वापर करा : जिल्हाधिकारी मित्तल

पाण्याची नासाडी रोखा; पाणी वापराबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे कडक निर्देश

पुढारी वृत्तसेवा

जालना : जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थिती आणि पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर उपलब्ध पिण्याच्या पाण्याचा काटकसरीने वापर करावा, पाण्याची नासाडी रोखावी तसेच प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा पुनर्वापर वाढवावा, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्षा आशिमा मित्तल यांनी दिले आहेत. सन २०२६ च्या खरीप हंगामात ‘ट्रिगर-१’ लागू असलेल्या तालुक्यांमध्ये या आदेशाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

जालना जिल्ह्यातील काही भागांत अपुरा व अनियमित पाऊस, उपलब्ध जलसाठ्यांवरील वाढता ताण आणि भूजल पातळीत होणारी घट लक्षात घेता पिण्याच्या पाण्याचे संरक्षण करणे आवश्यक झाले आहे. या परिस्थितीत नागरिकांसह शासकीय व निमशासकीय कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, शैक्षणिक संस्था, खासगी आस्थापना, बांधकाम व्यावसायिक, कंत्राटदार आणि पाणीपुरवठादारांनी पाण्याचा जबाबदारीने वापर करावा, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

बांधकाम, काँक्रीट क्युरिंग, बांधकाम परिसरातील धूळ नियंत्रण, रस्ते व परिसर स्वच्छता अशा बिगर-पेयजल कामांसाठी पिण्याच्या पाण्याचा वापर करू नये. त्याऐवजी प्रक्रिया केलेले सांडपाणी, पुनर्वापरित पाणी किंवा अन्य योग्य पर्यायी जलस्रोतांचा वापर करावा.

उपलब्ध पाण्याचा अपव्यय होणार नाही, याची जबाबदारी संबंधित बांधकाम व्यावसायिक व कंत्राटदारांवर राहणार आहे. आदेशाची अंमलबजावणी झाल्यानंतर तिचा नियमित आढावा घ्यावा, असेही निर्देश देण्यात आले आहे.

आरओ केंद्रांना पाण्याच्या अपव्ययाबाबत सूचना

दुष्काळ व पाणीटंचाईच्या काळात जिल्ह्यातील आरओ वॉटर सेंटर आणि पाणी शुद्धीकरण केंद्रांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने व कार्यक्षमतेने वापर करावा. पाणी शुद्धीकरण प्रक्रियेदरम्यान निर्माण होणाऱ्या ‘रिजेक्ट वॉटर’चा अनावश्यक अपव्यय टाळून त्याचा योग्य पुनर्वापर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या पाण्याचा पुनर्वापर शक्य नसल्यास लागू नियम व तांत्रिक निकषांनुसार त्याची विल्हेवाट लावावी. संबंधित अधिकाऱ्यांनी या केंद्रांची तपासणी करून नियमांचे उल्लंघन आढळल्यास आवश्यक कारवाई करावी.

टँकरद्वारे पाणीपुरवठा करताना दक्षता

दुष्काळी परिस्थितीत पाणीपुरवठ्यासाठी वापरण्यात येणाऱ्या शासकीय तसेच खासगी टँकरची टाकी, झडपा, पाइप आणि इतर उपकरणे सुरक्षित व सुस्थितीत असल्याची खात्री करावी. पाणी वाहतूक करताना गळती किंवा सांडपाणी होणार नाही, याची काळजी घ्यावी. टँकरमधून पाणी सांडणे, गळती होणे किंवा अन्य प्रकारे नासाडी होत असल्याचे आढळल्यास संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नोंद घेऊन जबाबदारी निश्चित करावी.

वाहन धुलाई केंद्रांवर निर्बंध

वाहन धुलाई केंद्रांनी सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेतील पिण्याच्या पाण्याचा वाहन धुण्यासाठी अनावश्यक वापर टाळावा. शक्य असेल तेथे पुनर्वापरित पाणी किंवा कायदेशीररीत्या उपलब्ध पर्यायी जलस्रोतांचा वापर करावा. पाण्याची बचत करणाऱ्या पद्धतींचा अवलंब करणे बंधनकारक राहणार असून, संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था व सक्षम प्राधिकरणांनी तपासणी करून पाण्याचा अनावश्यक अपव्यय होणार नाही, याची खात्री करावी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT