आष्टी : परतूर तालुक्यातील वडारवाडी येथे ऊसतोड मुकादमाने मस्करीत पिस्टल मधून केलेल्या गोळीबारात एकजण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना सोमवार ता. 27 रोजी सायंकाळी घडली आहे. दरम्यान घटनेनंतर आरोपी फरार झाला असून पोलीसांची तिन पथके त्याचा शोध घेत आहेत.
या विषयी अधिक माहिती अशी की सोमवारी सायंकाळी वडारवाडी येथील गंगाधर शामराव गायकवाड त्यांचा चुलतभाऊ सुभाष गायकवाड व ऊसतोड मुकादम अशोक तिपान्ना चौगुले रा. कुप्पा ता. वडवणी जि. बीड असे तिघे जण गप्पा मारत बसले होते. अशोक चौगुले हा गेले दोन वर्षापासून गावात येत असल्याने त्यांचा चांगला परिचय झाला होता. गप्पा मारत असतांना अशोक चौगुले याने स्वतः कडील पिस्टल गंगाधर गायकवाड व सुभाष गायकवाड यांना दाखवले. यावर तू पिस्टल कशाला आनले असे गंगाधर याने विचारले असता जो ऊसतोड मजुरांचा हवाला घेऊन ऊसतोड मजुर पाठवत नाही त्याला मारण्यासाठी मी पिस्टल आणले आहे.
यावर गंगाधर याने मी हवाला घेतला तर मलाही मारशील का असे म्हणाले असता हो मारीन असे म्हणाला. या वर मारून दाखव असे म्हणताच अशोक याने पिस्टल मधून एक गोळी गंगाधर याच्या डाव्या हाताच्या कोपरावर झाडली या मुळे गंगाधर जखमी झाले. हे पहताच घटनास्थळावरून पळून गेला. या प्रकरणी गंगाधर गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी अशोक चौगुले याच्या विरोधात आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश सुरवसे हे करीत आहेत.
आरोपी च्या शोधासाठी पथके रवाना
दरम्यान आरोपी अशोक चौगुले हा घटनास्थळावरून फरार झाला असून त्याचा शोध घेण्यासाठी तिन पथके रवाना करण्यात आले आहेत आरोपी लवकरच सापडेल असे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश सुरवसे यांनी सांगितले.