जालना ः जालना शहर महानगरपालिकेच्या मालकीचा आणि शहरात एकमेव सार्वजनिक असलेला स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलाव दुरुस्तीअभावी अडगळीत पडला आहे. या तलावाकडे मनपा प्रशासनासह लोकप्रतिनिधींनीही कानाडोळा केल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, मोती बाग तलावाच्या निसर्गरम्य काठावर हा तलाव सुरू होता. परंतु काही दुर्घटना घडल्यामुळे गेल्या पाच वर्षांपासून तलावाला टाळे ठोकले होते. परंतु जालनेकरांचा रेटा, नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत वारंवार या संदर्भात झालेली चर्चा लक्षात घेता शासनाने जिल्हा नियोजन विकास समितीच्या निधीतून या तलावाच्या दुरुस्तीला निधी दिला.
तत्कालीन आयुक्त संतोष खांडेकर यांच्या पुढाकारातून या स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलावाच्या दुरुस्तीचे कामही सुरू झाले होते. मात्र, आता मनपाचा कारभार लोकप्रतिनिधींच्या हाती आला आहे. यावर मनपाच्या सभागृहात कोणीही आवाज उठवत नसल्याचे दिसून येत आहे. याकडे मनपा प्रशासनाचे घोडं कुठे अडले आहे, असा सवाल उपस्थित केल्या जात आहे.
कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेला वीर सावरकर जलतरण तलाव गेल्या अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत धूळखात पडला आहे. विशेष म्हणजे, महापालिकेतील दालनांच्या नूतनीकरणासाठी आणि श्रेयासाठी आगपाखड करणारे लोकप्रतिनिधी या महत्त्वाच्या विषयावर मूग गिळून गप्प असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. हा तलाव केव्हा दुरुस्त होऊन शहरवासीयांना सेवेसाठी उपलब्ध होईल, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.
अनास्थेविरोधात आंदोलन करू- मोती तलावाशेजारी वीर सावरकर जलतरण तलावाची निर्मिती करण्यात आलेली आहे. शहरातील एकमेव सार्वजनिक तलाव आहे. मात्र, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हा प्रकल्प आज पांढरा हत्ती ठरत आहे. मनपा प्रशासनाने त्वरित तलाव दुरुस्त करावा अन्यथा आंदोलन करण्यात येईल.ॲड. ईश्वर बिल्होरे, हिन्दू महासभा, जालना.