Crime News pudhari photo
जालना

Jalna Crime : ट्रॅक्टर खरेदीच्या व्यवहाराच्या वादातून शेजाऱ्यावर जीवघेणा हल्ला

जातीवाचक शिवीगाळ करत गाड्यांना पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न

पुढारी वृत्तसेवा

जालना : ट्रॅक्टरच्या व्यवहाराचे पैसे आणि हप्त्यावरून झालेल्या वादानंतर एका शेजाऱ्याने जातीवाचक शिवीगाळ करत छातीत दगड मारून जखमी केल्याची व वाहनांवर पेट्रोल ओतून पेटवून देण्याचा प्रयत्न केल्याची खळबजनक घटना जालन्यातील वरखेड गावात घडली आहे. या प्रकरणी शेवली पोलिस ठाण्यात चार जणांविरुद्ध ॲट्रॉसिटी कायद्यासह (ॲट्रॉसिटी प्रतिबंधक कायदा) विविध गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुधाकर भाऊराव खाडे (वय ५०, रा. वरखेड, ता. जि. जालना) हे शेती करतात. त्यांचे मेहुणे संतोष गणपत काळे यांनी ३१ डिसेंबर २०२४ रोजी गावातील मारोती बाबासाहेब काकडे यांच्याकडून एक ट्रॅक्टर खरेदी केला होता आणि बँकेत ९२, हजार रुपयांचा हप्ता भरला होता. मात्र, ट्रॅक्टर व्यवस्थित चालत नसल्यामुळे तो मारोती काकडे यांना परत करण्यात आला आणि त्यांनी पैसे व हप्ता परत करण्याचे आश्वासन दिले होते.

बरेच दिवस होऊनही पैसे मिळत नसल्यामुळे, १६ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास सुधाकर खाडे हे इतर काही लोकांसह मारोती काकडे यांच्या वरखेड येथील शेतावरील घरी गेले होते. मारोती बाबासाहेब काकडे हे घरीच होते. तुमचे ट्रॅक्टर तुम्हाला परत केले. तुम्ही माझे पैसे परत करा असे खाडे यांनी म्हणताच काकडे यांनी खाडे यांना जातीवाचक शिवीगाळ करुन काय करायचे ते कर असे म्हणून धमकी दिली.

तिथे आलेले इतर आरोपी बाबासाहेब श्रीरंग काकडे, कौसाबाई बाबासाहेब काकडे आणि शिवकन्या मारोती काकडे यांनी मिळून मारहाण केली. मारोती काकडे याने हातातील दगड मारून सुधाकर खाडे यांच्या डाव्या बाजूच्या बरगडीवर मारून जखमी केले. तसेच, कौसाबाई काकडे व शिवकन्या काकडे यांनी फिर्यादीच्या आणि राजू तुकाराम राठोड यांच्या गाडीवर पेट्रोल टाकत तुम्हाला गाडीसहित जाळून टाकतो, अशी धमकी दिली.

पोलिस कारवाई या प्रकरणी पीडित व्यक्तीच्या फिर्यादीवरून मारोती बाबासाहेब काकडे, बाबासाहेब श्रीरंग काकडे, कौसाबाई बाबासाहेब काकडे आणि शिवकन्या मारोती काकडे यांच्याविरोधात शेवली पोलिस ठाण्यात ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT