जालना : वृक्षसंवर्धनाचा वसा घेतलेल्या योगा ग्रुप मित्र मंडळाने आता उन्हाळ्यात शहरातील झाडे जगविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यांनी स्वखर्चातून टँकरव्दारे पाणी देण्याचा उपक्रम रविवार (दि. 15) पासून राबविण्यास सुरूवात केली आहे. इतर सेवाभावी संस्थांनी देखील या वृक्षसंवर्धनाच्या यज्ञात समिधा टाकण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन या निमित्ताने करण्यात येत आहे.
गौरक्षण पांजारापौळ येथील योगा ग्रुपने श्री संतोषी माता पुल, मुंढे चौक, पांजारापौळ परिसर तसेच नवीन मोंढा रोड भागातील रस्त्याच्या कडेला लावलेल्या वृक्षांची काळजी घेण्याचे काम या मित्रमंडळाने हाती घेतले आहे.
उन्हाळ्यात परिसरातील वृक्ष पाण्याअभावी जळून जातात. ही बाब लक्षात घेऊन योगा ग्रुपमधील सदस्य झाडांना पाणी घालत आहेत. या उपक्रमामुळे परिसरातील झाडे तग धरून राहण्यास मदत होत आहे. विशेष म्हणजे योगा ग्रुपचे सदस्य उपस्थित राहून वृक्षाना पाणी घालत आहेत.
हा उपक्रम यशस्वीरित्या पार पाडण्याकरीता खंडेश जाधव, किशोर आगलावे, सतीश जाधव, सतीश ससाने, राजेंद्र राठी, अंकुश अनपट, विलास अंपाळकर यांच्यासह सदस्य परिश्रम घेत आहेत.
योगा ग्रुप मित्र मंडळातील सदस्य सामाजिक बांधिलकी जपत पर्यावरण संवर्धनासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत. नागरिकांनीही वृक्षांचे महत्त्व ओळखून अशा उपक्रमांना सहकार्य करावे. तसेच आपल्या परिसरातील झाडांची काळजी घ्यावी.अजित मानधानी
संपूर्ण उन्हाळा आम्ही हा उपक्रम नियमितपणे सुरू ठेवणार आहोत. पर्यावरणाचे संरक्षण आणि हरित परिसर निर्माण करण्यासाठी नागरिकांनीही पुढे यावे, अशी अपेक्षा आहे.सतीष जाधव