Jalna tobacco free schools pudhari photo
जालना

Jalna tobacco free schools : तंबाखूमुक्त पिढीच्या दिशेने जालना जिल्ह्याचे दमदार पाऊल

१०१ शाळा तंबाखूमुक्त; १० ते १६ ऑगस्ट दरम्यान पार पडल्या कार्यशाळा

पुढारी वृत्तसेवा

जालना: राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम (NTCP) जिल्हा रुग्णालय अंतर्गत जालना जिल्ह्यात ‘तंबाखूमुक्त शाळा’अभियानाची प्रभावी अंमलबजावणी सुरू असून, विद्यार्थ्यांना तंबाखूच्या व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी जिल्ह्यात विविध जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येत आहेत. या अभियानाला शाळांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून आजपर्यंत जिल्ह्यातील १०१ शाळांनी तंबाखूमुक्त शाळेचे निर्धारित निकष पूर्ण केले असल्याचे जिल्हा रुग्णालय जालना यांनी कळविले आहे.

राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत शाळांमध्ये तंबाखूविरोधी विविध उपक्रम राबविले जात आहेत. यामध्ये तंबाखूमुक्त शाळेसाठी निर्धारित ९ निकषांची पूर्तता करणाऱ्या शाळांचा आढावा घेऊन त्यांना तंबाखूमुक्त करण्यात येत आहे.

यासाठी १० ते १६ ऑगस्ट दरम्यान प्रथम जिल्हास्तरीय सर्व तालुका शिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख व विस्तारअधिकारी यांची कार्यशाळा घेण्यात आली त्यानंतर प्रत्येक तालुक्यामध्ये सर्व मुख्याध्यापक व शिक्षक यांची कार्यशाळा घेऊन, यामध्ये शाळा परिसरात तंबाखूजन्य पदार्थांचा वापर व विक्री होणार नाही याची दक्षता, तंबाखूमुक्तीबाबत जनजागृती करणारे फलक, विद्यार्थ्यांना तंबाखूच्या दुष्परिणामांची माहिती, तंबाखूमुक्तीची शपथ तसेच शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांचा सहभाग यासारख्या बाबींवर विशेष भर देण्यात आला आहे.

या अभियानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये ‘तंबाखूला नकार, निरोगी जीवनाला स्वीकार’ हा संदेश पोहोचविण्यात येत आहे. शाळांमध्ये तंबाखूच्या दुष्परिणामांबाबत मार्गदर्शन, जनजागृती कार्यक्रम, शपथविधी तसेच तंबाखूविरोधी संदेश देणाऱ्या विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.

अजून शाळा वाढणार

विद्यार्थ्यांच्या माध्यमातून हा संदेश त्यांच्या कुटुंबापर्यंत आणि समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. यावर्षी एप्रिल २०२६ ते आजपर्यंत १०१ शाळा तंबाखूमुक्त करण्यात आल्या असून हा उपक्रम येथेच थांबणार नसून पुढील काळात जिल्ह्यातील आणखी शाळांचा तंबाखूमुक्त शाळा अभियानात समावेश करण्यात येणार आहे. संबंधित शाळांना निर्धारित निकषांची पूर्तता करण्यासाठी मार्गदर्शन व आवश्यक सहकार्य करण्यात येणार आहे.

आरोग्य सुरक्षित राहावे

तंबाखूचे सेवन सुरू होण्यापूर्वीच त्याला प्रतिबंध करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश असून, ‘तंबाखूमुक्त शाळा - तंबाखूमुक्त परिसर तंबाखूमुक्त पिढी’ या संकल्पनेच्या दिशेने जालना जिल्ह्याची वाटचाल सुरू आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी आणि भावी पिढीला व्यसनमुक्त करण्यासाठी हा उपक्रम निश्चितच महत्त्वपूर्ण ठरत आहे. येणाऱ्या पिढीला कोणत्याही प्रकारच्या व्यसनापासून पारवृत्त करणे, हा अभियानाचा उपक्रम आहे. यामुळे समाजमनाची मानसिकता बदलायला तयार होत असल्याचे दिसून येते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT