जालना जिल्ह्याचा पारा 36 अंशांवर  pudhari photo
जालना

Jalna weather update : जालना जिल्ह्याचा पारा 36 अंशांवर

तापमानात वाढ झाल्याने पाणीटंचाई वाढणार

पुढारी वृत्तसेवा

जालना : जिल्ह्यात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून मंगळवारी कमाल तापमान 36 तर किमान 22 अंश सेल्सिअसपर्यंत नोंदविण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्याच्या तापमानात सातत्याने वाढ होत असल्याने नागरिकांना उकाड्याचा त्रास जाणवू लागला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार आगामी काही दिवसांत तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याने जिल्ह्यात पाणीटंचाईचा प्रश्न डोके वर काढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

यंदा हिवाळा संपल्यानंतर लगेचच उन्हाचा जोर वाढू लागला आहे. सकाळपासूनच उन्हाची तीव्रता जाणवत असल्याने दुपारच्या सुमारास रस्त्यांवर नागरिकांची वर्दळ तुलनेने कमी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. ग्रामीण भागात विशेषतः दुपारच्या वेळी शेतकरी व मजुरांना काम करताना उष्णतेचा अधिक त्रास सहन करावा लागत आहे.

दरम्यान, तापमान वाढीसोबतच पाण्याची मागणी देखील वाढू लागली आहे. काही गावांमध्ये विहिरी आणि बोअरवेलचे पाणी कमी होऊ लागल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. उन्हाची तीव्रता अशीच वाढत राहिल्यास आगामी दिवसांत टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ येऊ शकते, अशी शक्यता स्थानिक पातळीवर व्यक्त केली जात आहे. उष्णतेपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी काळजी घेण्याचे अवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

टंचाईचे आव्हान

तापमान वाढीमुळे जिल्ह्यात उन्हाळ्याची तीव्र चाहूल जाणवू लागली असून, प्रशासनासमोर आगामी काळात पाणीपुरवठ्याचे नियोजन करणे हे मोठे आव्हान ठरण्याची चिन्हे दिसत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT