Jalna Sugarcane farmers' agitation will flare up
घनसावंगी / सुखापुरी, पुढारी वृत्तसेवा :
अंबड आणि घनसावंगी तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये यंदाच्या २०२५-२६ गाळप हंगामाच्या भावाबाबत तीव्र नाराजी उसळली असून आंदोलनाची ठिणगी पेटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. एकलहेरा येथे नुकत्याच घेण्यात आलेल्या ऊसउत्पादक शेतकऱ्यांच्या बैठकीत हा रोष उसळून बाहेर आला.
जिल्ह्यातील कारखानदारांनी जाहीर केलेली पहिली उचल ३२०० रुपये (बत्तीसशे) आणि अंतिम भाव ३५०० रुपये हा दर शेतकऱ्यांच्या अपेक्षेपेक्षा अत्यंत कमी असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. अनेक गावांमध्ये शेतकरी एकत्र येत असून गावनिहाय बैठका, समन्वय, आणि जनजागृती मोहीम सुरू आहे.
शेतकरी संघटनांच्या वतीने परिसरातील सर्वच सहकारी व खासगी कारखान्यांना पहिली उचल ३२०० रुपये तत्काळ देण्याबाबत लेखी निवेदन देण्यात आले आहे. मात्र, काही कारखान्यांकडून २६०० ते २७०० या दराची चर्चा होत असल्याचे समजताच शेतकरी आणखी संतप्त झाले आहेत. "कोणत्याही ऊस उत्पादकाला हा दर मान्य नाही," अशी स्पष्ट भूमिका बैठकीत मांडण्यात आली.
शेतकरी नेत्यांचे म्हणणे स्पष्ट
"पहिली उचल ३२०० रुपये मिळाली तर त्याचे श्रेय आम्ही कारखानदारांनाच देऊ. पण अन्यायकारक दर दिला तर आम्हाला आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागेल. चर्चेसाठी आमची दारे उघडी आहेत आता निर्णय कारखानदारांनी घ्यायचा आहे."
उसाची लागवड खर्चिक तरीही भाव वाढ नाही
'एक एकर उसासाठी आज किमान ५५ हजार रुपये खर्च येतो. खत, बियाणे, मजुरी, पाणी सर्वच बाबतीत खर्च वाढतोय; पण उसाचा भाव मागील पाच वर्षांपासून तसाच आहे."
आंदोलन उंबरठ्यावर
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या बैठका, गावोगावी होणारी चर्चा आणि शेतकऱ्यांचा वाढता रोष पाहता या वर्षी ऊस भावाच्या मुद्द्यावर मोठे आंदोलन उभे राहण्याची शक्यता आहे. शेतकरी कठोर भूमिकेत असून, योग्य दर मिळाल्याशिवाय उसाचा एकही गठ्ठा कारखान्यात जाणार नाही, असा निर्धार शेतकरी व्यक्त करत आहेत.