निमखेडा बु. : जाफराबाद तालुक्यातील विज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे निमखेडा बु. ता.जाफराबाद येथील शेतातून गेलेल्या विजेच्या ताराच्या घर्षण होऊन शार्टसर्कीटमुळे निमखेडा येथील सुमारे 60 एकर उभ्या ऊसाला आग लागली,त्यामुळे पुर्ण ऊस जळुन भस्मसात झाला.सुमारे 3 हजार 500टन ऊसाचे क्षेत्र जळून भस्मसात झाले असून 1 कोटी 50 लाखांचे नुकसान झाले आहे.
दरम्यान,सदरील घटना ता.20 रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास घडली. निमखेडा गावात ऊस ऊत्पादक शेतक-यांचे आर्थिक नुकसान झाले असतांना विज वितरण कंपनीचे अधिकारी, महसुलचे अधिकारी स्थळ पाहणीसाठी न आल्यामुळे शासनाचे लक्ष्य वेधण्यासाठी निमखेडा बु. येथील शेतक-यांनी ता.20 रोजी दुपारी दिड वाजेपासुन डॅा.बाबासाहेब आंबेडकर चौकात रास्ता रोको आंदोलन सुरु केले. त्यामुळे जाफराबाद येथुन विदर्भ, खानदेश आणि छत्रपती संभाजीनगरकडे जाणारी वहातुक विस्कळीत झाली होती.
अधिक माहीती अशी की, जाफराबाद तालुक्यातील ऊसाचे क्षेत्र असलेल्या निमखेडा बु.,देऊळझरी, हनुमंतखेडा, ब्रम्हपुरी, कुंभारझरी, आळंद, हिवराकाबली, नळविहीरा यासारख्या ऊसाचे क्षेत्र असलेल्या गावातून विज वितरण कंपनीचे उपविभागीय अभियंता चेतन मोहेकर यांना शेतामध्ये लोबंकळलेल्या विजेच्या तारा, आणि वाकलेले विजेचे खांब,याविषयी शेतक-यांनी अर्ज देऊन दुरुस्तीची मागणी केली होती.
परंतु याकडे दुर्लक्ष केल्यामुळे ता.20 रोजी निमखेडा शिवारात ऊसाच्या शेतात शार्टसर्कीट झाले. ज्यामध्ये जिजाबाई हिवाळे, बाबुराव चव्हाण, उत्तम चव्हाण, गंजीधर चव्हाण, प्रभाकर चव्हाण, विठ्ठल चव्हाण, वाल्मिक हिवाळे, प्रल्हाद हिवाळे, सुभाष चव्हाण, याचे ऊस तर हरीदास वाघमारे यांची कपाशी , तूर जळून भस्मसात झाली. ऐन दिवाळी सणासुदीच्या काऴात या शेतक-यांच्या घरी काळा कुट्ट अंधार झाला आहे. तालुक्यात इतकी विदारक घटना घडलेली असतांना प्रशासकीय यंत्रणा घटनास्थळी गेली नाही, अथवा स्थळ पहाणी पंचनामा केला नाही.त्यामुळे निमखेडा येथील शेतकरी संतप्त होऊन त्यांनी जाफराबाद येथे डॅा.बाबासाहेब आंबेडकर चौकात रास्ता रोको आंदोलन सुरु केले.
दरम्यान,आंदोलन कर्त्या शेतक-यांची पोलीस निरीक्षक सतिश जाधव, अभिंयंता भुसारी, मंडळ अधिकारी काळेयांनी भेट घेऊन रास्ता रोको आंदोलन मागे घ्यावे असे आवाहन केले. पंरतू जोपर्यत उपविभागीय अधिकारी, तहसिलदार , उपविभागीय अभियंता, जोपर्यत येऊन आमच्या मागण्यांचे निराकरण करत नाही, तोपर्यत आम्ही रास्ता रोको आंदोलन करण्यावर ठाम असल्याचे शेतक-यांनी सांगितले.