Jalna Sorghum Cash Crop
आन्वा, पुढारी वृत्तसेवा : ज्वारी, बाजरी, आदी पिकांकडे पूर्वी शेतकऱ्यांचा कल होता, मात्र, हळूहळू ज्वारीचा पेरा कमी होत गेला. यंदाच्या खरिपात १ लाख हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत १ लाख हेक्टरमध्ये आटोपलेल्या पेरणीमधे सर्वाधिक कपाशी ४४ हजार हेक्टर, मका २९ हजार हेक्टरवर तर सोयाबीन २० हजार हेक्टर लागवड करण्यात आली असून यामध्ये ज्वारी, बाजरी पिकाचे क्षेत्र कमी झाले आहे.
यावर्षीच्या खरीप हंगामासाठी सुरुवातीला पाऊस झाला. त्यानंतर अनियमित झालेल्या पावसामुळे पेरण्यांचे नियोजन विस्कटले. त्यानंतर पावसाची रिपरिप सुरू झाल्याने पेरण्यांनी गती पकडली, पूर्वी ज्वारी, उडीद, मूग आदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जातात होते.
मात्र, हळूहळू शेतकऱ्यांचा कल सोयाबीन, कापूस, मका, मिरची पिकांकडे वाढला आहे. यंदाही कपाशीचा पेरा सर्वाधिक आहे. यासोबतच मका, सोयाबीन पिकांवरही शेतकऱ्यांचा अधिक विश्वास असल्याचे दिसून येते. या भागातील शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. त्यामळे सोयाबीनची लागवड केली जाते. सोयाबीन हे पीक भरघोस येते आणि उत्पन्नही चांगले मिळते. त्यामुळे सोयाबीनच्या पेरणी क्षेत्रात वाढ होत आहे.
ज्वारी पिकाचे उत्पादन पूर्वी घेत होतो, मात्र. ज्वारी पिकांची खूप काळजी घ्यावी लागते. त्या तलनेत सोयाबीनचे तसे नाही. सोयाबीन हमखास उत्पादन देणारं पीक आहे.लक्ष्मण लव्हाळे, कुकडी