Jalna Six suspected robbers arrested
जालना, पुढारी वृत्तसेवा: जालना शहरात दरोड्याचा प्रयत्न करणाऱ्या सहा दरोडेखारांच्या चंदनझिरा पोलिसांनी मुसक्या आवळल्या. दरोडेखोरांच्या ताब्यातून पिस्टल, कोयता, चाकू, लोखंडी टॉमी, मोठे स्क्रू ड्रायव्हरसह दोन दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या.
चंदनझिरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील श्रीकृष्ण रुख्मिणी नगरात राहणाऱ्या शैलेश देवीदान यांच्या घरात अज्ञात ९ ते १० दरोडेखोरांनी हातात बंदुक, कोयता, चाकू, लोखंडी टॉमी, स्कड्रायव्हवरसह प्रवेश केला होता. यावेळी वॉचमन सुनील रंगनाथ बुट्टे याने त्यांना प्रतिकार करून आरडाओरड केल्याने दरोडेखोरांनी त्याचे सोबत झटापट केली व ते पळून गेले होते. सदर घटनेची माहिती मिळाताच चंदनझिरा पोलिस स्टेशनच्या रात्री गस्तीवर असलेल्या दोन्ही वाहनांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली होती.
त्यानंतर या प्रकरणातील ६ दरोडेखोरांना चंदनझिरा पोलिसांनी अटक केली. सदर गुन्हयामध्ये एक विधीसंघर्षग्रस्त बालकाचा सहभाग असल्याचे दिसून आले. चंदनझिरा पोलिसांच्या रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार सचिन गायकवाड़ व सुरज गायकवाड (दोघे रा. चंदनझिरा) या दोन्ही सख्ख्या भावांचा देखील गुन्हयातील सहभाग निष्पन्न झाला आहे.
सचिन गायकवाड व सुरज गायकवाड यांचे विरुध्द पोलिस ठाणे चंदनझिरा येथे खुनाचा प्रयत्न, मारामारी, दंगा करणे, अवैधपणे कोयता, तलवार व गावठी पिस्टल बाळगणे आदी गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यात सचिन कैलास गायकवाड, सुरज कैलास गायकवाड, रमन भगीरथ गौड, अजय राजेंद्र दांडगे (सर्व रा. चंदनझिरा जलना), प्रवीण संजय पवार (रा. कैकाडी मोहल्ला जालना, आकाश सर्जेराव गायकवाड (रा. पिरपिळगाव ता. जि. जालना) यांना अटक करण्यात आली आहे. अटक आरोपीची पोलिस कस्टडी रिमांड घेण्यात आली आहे.
यांनी केली कारवाई
सदर कारवाई पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलिस अधीक्षक आयुष नोपानी, उपविभागीय पोलिस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक बाळासाहेब पवार, स्थागुशाचे पोलिस निरीक्षक पंकज जाधव, सपोनि सुशील चव्हाण, पोउपनि रवी देशमाने, मारीयो स्कॉट, अंमलदार मन्सुब वेताळ, कृष्णा तंगे, रिंकु देशमुख, रविंद्र देशमुख, राजेंद्र ठाकुर, राजू पवार, साई पवार, संतोष वनवे, अशोक जाधव, जितेंद्र तागवाले, समाधान उगले, अभिजीत वायकोस, राजु मोरे, अनिल चव्हाण, सतिष देखमुख, सागर खैरे, दिपक डेहंगळ, गजानन काकडे, स्थागुशाचे सागर बावीस्कर यांनी केली आहे.