अमृतराजे देशमुख यांना हरणाचे पिल्लू एकटे व घाबरलेल्या अवस्थेत आढळले Pudhari
जालना

Deer Rescued Jalna | आईपासून बिछडलेल्या हरणाच्या पिल्लाला वन विभागाकडे सुरक्षित सुपूर्द

अमृतराजे देशमुख यांच्या सतर्कतेमुळे वन्यजीवाला मिळाले जीवदान

पुढारी वृत्तसेवा

Wildlife Rescue Jalna

जालना : मानवता आणि वन्यजीव संवर्धनाचा आदर्श घालून देणारी घटना पारध परिसरात घडली. येथील शेतकरी अमृतराजे देशमुख यांनी आईपासून बिछडलेल्या हरणाच्या पिल्लाला सुरक्षितपणे वन विभागाच्या ताब्यात देत संवेदनशीलतेचे दर्शन घडविले. त्यांच्या तत्परतेमुळे एका मुक्या वन्यजीवाचे प्राण वाचण्यास मदत झाली.

शेतात नियमित काम सुरू असताना अमृतराजे देशमुख यांना एक हरणाचे पिल्लू एकटे आणि घाबरलेल्या अवस्थेत दिसून आले. पिल्लू आईपासून बिछडल्याचे लक्षात येताच त्यांनी कोणताही अविचारी निर्णय न घेता तात्काळ धावडा वनपरिक्षेत्र कार्यालयाशी संपर्क साधून माहिती दिली.

माहिती मिळताच धावडा वनपरिक्षेत्राचे वनसेवक घनश्याम गव्हाणे यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेत हरणाच्या पिल्लाला सुरक्षित ताब्यात घेतले. त्यानंतर त्याची आवश्यक तपासणी करून वन विभागाच्या नियमानुसार नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडण्याची प्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

यावेळी अमृतराजे देशमुख म्हणाले, "शेतात काम करत असताना हे पिल्लू घाबरलेल्या अवस्थेत दिसले. त्याची सुरक्षितता महत्त्वाची वाटल्याने मी स्वतः काहीही करण्याऐवजी तात्काळ वन विभागाशी संपर्क साधला. वन्यजीव हे आपल्या निसर्गाचे अमूल्य वैभव असून, अशा वेळी प्रत्येक नागरिकाने संवेदनशीलता दाखवत वन विभागाला सहकार्य करणे गरजेचे आहे."

वन विभागानेही नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, जखमी अथवा आईपासून बिछडलेले वन्यप्राणी आढळल्यास त्यांना स्वतः हाताळण्याचा प्रयत्न करू नये. अशा वेळी त्वरित वन विभागाशी संपर्क साधल्यास वन्यजीवांचे प्राण वाचविण्यास मोठी मदत होऊ शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT