जालना : तालुक्यातील पानशेंद्रा शिवारात सीड पार्क उभारण्यात येणार आहे. या सीड पार्कच्या मुख्य रस्त्यासाठी श्रीकृष्णनगर येथे पन्नास वर्षांपासून राहत असलेल्या लोकांची घरे हटविण्यात येणार आहे. या अतिक्रमणधारकंना तहसीलदार यांच्या स्वाक्षरीने नोटीस बजावण्यात आली आहे. यामुळे येथील जवळपास सत्तर कुटुंब बेघर होण्याची भीती व्यक्त होत आहे.
जालन्यात सौड पार्क उभारण्यात येणार असल्याची राज्यमंत्रिमंडळाने २०१७ मंजुरी दिलेली आहे. यासाठी पानशेंद्रा शिवारातील जमिनीचे भूसंपादन करण्यात आले. गेल्या दोन महिन्यांत या ठिकाणी रस्त्यांचे काम करण्यात आले आहे. परंतु जालना-देऊळगाव राजा महामार्गावरून सीड पार्कला जाण्यासाठी संबंधित विभागाने सव्र्व्हे करून श्रीकृष्णनगर गट क्रंमाक ४१ मधील काही जमीन घेण्याचा निर्णय घेतला.
ज्या मार्गावरून हा रस्ता नेण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्या ठिकाणी जवळपास तीस ते ३५ कुटुंब राहत असल्याचे नोटीसमध्ये म्हटले आहे. अतिक्रमणात जिल्हा परिषद शाळेचा देखील समावेश आहे. मागील पन्नास या ठिकाणी कुटुंब राहतात. या ठिकाणी मोलमजुरी करणारे कुटुंब राहतात. यांच्याकडे रहिवासी पुरावा आहे. याशिवाय ग्रामपंचायतीच्या वतीने पाणीपुरवठा तसेच इतर सुविधा पुरविण्यात येतात. पूर्वकल्पना न देता या कुटुंबांना नोटिसा दिल्याने बेघर होण्याची धास्ती कुटुंबप्रमुखांनी घेतलेली दिसते. इतर ठिकाणाहून रस्ता नेण्यात यावा, अशी मागणी होत आहे.
महसूलच्या वतीने देण्यात आलेल्या नोटिसात याचा आहे उल्लेख
महसूल विभागाच्या वतीने जालना तहसीलदार यांच्या माध्यमातून शुक्रवार (दि. २७) रोजी श्रीकृष्ण नगर येथील सुमारे ७० झोपडपट्टीधारकांना नोटीस बजावून २७ फेब्रुवारीपर्यंत अतिक्रमण हटविण्याचे आदेशित करण्यात आले आहे. तसेच जागेसंदर्भात पुरावे असल्यास २७ फेब्रुवारीपर्यंत पुराव्यानिशी खुलासा सादर करावा. अतिक्रमण स्वतः न काढल्यास तसेच समाधानकारक खुलासा सादर न केल्यास रीतसर कारवाई करण्यात येईल, असे नोटिसीत बजावले आहे. तहसीलच्या वतीने २० फेब्रुवारी रोजी नोटिसा जारी करण्यात आल्या होत्या. मात्र, संबंधित अतिक्रमणधारकांना त्या ऐन २७ फेब्रुवारी रोजी मिळाल्या. त्यामुळे अतिक्रमणधारकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केल्या जात आहे.
५५ वर्षांपासून या गावात वास्तव्य मागील ५० ते ५५ वर्षांपासून या ठिकाणी आमचे कुटुंब वास्तव्यास आहे. महसूल विभागाकडून आमच्या वस्तीला अतिक्रमण म्हणून सौड पार्कच्या रस्त्यासाठी हटविण्याचा प्रयत्न करत आहे. महावितरणचे लाईट बिल, ग्रामपंचायतीची पाणीपट्टी आम्ही भरतो. शासनाने आमच्यावर अन्याय करू नये. वस्ती हटविण्यापेक्षा रस्ता दुसऱ्या बाजूने घेण्यात यावा.बाळू आरके, रहिवासी, श्रीकृष्णनगर
सीडपार्कसाठी पर्यायी मार्ग शोधावा- 66 अनेक वर्षांपासून मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणारे अनेक कुटुंब येथे राहतात. शासनाच्यावतीने त्यांना बेघर न करता रस्त्यासाठी पर्यायी मार्ग शोधावा. नाहीतर बेघर होणाऱ्या कुटुंबांचे पुनर्वसन करावे.गणेश कुसळकर, सदस्य, ग्रामपंचायत श्रीकृष्णनगर
७० जणांना दिल्या नोटिसा- पानशेंद्रा सीड पार्कसाठी शासकीय जमिनी गट क्रमाक ४१ मधून रस्ता प्रस्तावित आहे. या गटातील ७० अतिक्रमण धारकांना नोटिसा देण्यात आल्या आहे. आम्ही वरिष्ठाच्या सूचनेचे पालन करतो.रोशनी चोकडे, ग्राममहसूल अधिकारी