जालना : मार्गदर्शन करताना आनंदराज आंबेडकर . pudhari photo
जालना

Jalna SC sub categorisation protest : अनुसूचित जाती उपवर्गीकरणाविरोधात जालन्यात आंबेडकरी जनतेचा एल्गार

‘जय भीम’चा जयघोष, जालन्यात आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात संघर्ष विराट मोर्चा, उत्स्फूर्त प्रतिसाद

पुढारी वृत्तसेवा

जालना : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अनुसूचित जातींसाठी १३ टक्के आरक्षणाची दिलेली चौकट सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या नावाखाली शासन मोडू पाहत आहे. यामुळेच अनुसूचित जाती उपवर्गीकरणाचा घाट घातल्या जात आहे. ५९ जाती एकसंध राहाव्यात, आणि आरक्षणाची चौकट मोडू नये, यासाठी जालना शहरात मंगळवार, दि. २१ रोजी उप वर्गीकरणाविरोधात आंबेडकरी जनता रस्त्यावर उतरली.

मस्तगड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वात आरक्षण उप वर्गीकरणाविरोधात संघर्ष विराट मोर्चा काढण्यात आला. मोर्चानंतर सभा पार पडली. या सभेवेळी पावसाने पाऊण तास हजेरी लावली. या पावसातही भीमसैनिक जागेवरून हलले नाही.

दरम्यान, सकाळी ११ वाजल्यापासून जालना जिल्हाभरातील भीमसैनिक मस्तगड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाजवळ जमू लागले. दुपारी १ वाजताच्या दरम्यान रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्यासह घटनातज्ञ ॲड. सुरेश माने, माजी मंत्री बबनराव घोलप, अमन आंबेडकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला मानवंदना देत विराट मोर्चाला मस्तगड येथून सुरुवात झाली. मोर्चेकरी महात्मा गांधी चमन मार्गे शनिमंदिर चौकातून पुढे नूतन वसाहत उड्डाणपुलावरून अंबड चौफुली दरम्यान निघाले.

यावेळी जय भीम, दिलं भीमानं खा गुमानं, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, आरक्षण उप वर्गीकरण रद्द करा, या सरकारचं करायचं काय, खाली मुंडक वर पाय, अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी मोर्चात आनंदराज आंबेडकर, ॲड. अमन आंबेडकर, ॲड. सुरेश माने, संजय खामकर, परसराम इंगोले, महापौर वंदना मगरे, ॲड. शिवाजीराव आदमाने, ॲड. ब्रह्मानंंद चव्हाण, सुधाकर निकाळजे, विलास डोळसे, डॉ.सुशील सुर्यवंशी, महेंद्र रत्नपारखे, संदीप खरात, हरीष रत्नपारखे, ॲड. रिमा खरात, निखील पगारे, राहुल रत्नपारखे, जितू उघडे, मुरली बोबडे, भास्कर शिंदे, विनोद रत्नपारखे, सुनील रत्नपारखे, अमोल रत्नपारखे, सुनील साळवे, महेंद्र बनकर, राजेश सदावर्ते, अरुण वाघमारे, कुणाल दहीवाळ, कपिल खरात यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

या मोर्चात तरुणांसह ज्येष्ठ तसेच महिलांची लक्षणिय उपस्थिती लाभली. यावेळी पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता.

बिस्किट आणि पिण्याच्या पाण्याची सोय

विराट मोर्चात सहभागी होणाऱ्या भीम अनुयायासांसाठी शहरातील स्थानिक नागरिकांनी पिण्याच्या पाण्यासह बिस्किटाच्या पुड्याची सोय केली. या मोर्चात जालना जिल्ह्यातील जाफराबाद, अंबड, मंठा, बदनापूर आदी तालुक्यांसह सिंदखेड राजा तालुक्यातील मोर्चेकरी सहभागी झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT