875 पीडितांना सखी वन स्टॉप सेंटरचा आधार pudhari photo
जालना

Sakhi One Stop Centre Jalna : 875 पीडितांना सखी वन स्टॉप सेंटरचा आधार

पीडितेला वैद्यकीय, कायदेशीर व समुपदेशनची मिळतेय सेवा

पुढारी वृत्तसेवा

जालना : समाजातील पीडित असलेल्या महिलांच्या पाठीशी उभे राहत लढा देवून त्यांना न्याय मिळवून देण्याचे कार्य सखी वन स्टॉप सेंटरच्या माध्यमातून केले जात आहे. जुन 2019 ते मार्च 2026 या अडीच वर्षांच्या कालावधीत आजपर्यंत 875 पीडित महिलांना वैद्यकीय, कायदेशीर, समुपदेशन, पोलिस सहाय्यता आणि गरजवंतांना निवाऱ्याची सोय करुन देण्यात आली आहे. त्यामुळे पीडित महिलांसाठी हे केंद्र हक्काचे आधारवड ठरले आहे.

शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात (घाटी) सखी वन स्टॉप सेंटर जुन 2019 पासून कार्यान्वित आहे. महिला व बालविकास मंत्रालयाकडून ते चालवले जात असून, या केंद्राच्या माध्यमातून पीडित महिलांना एकाच छताखाली आवश्यक त्या सेवा पुरविल्या जात आहेत.

शारीरिक, मानसिक, लैंगिक छळ, कौटुंबिक छळ, ॲसिड हल्ला किंवा सायबर क्राईममधील अत्याचारास बळी पडलेल्या महिलांना पोलिस, वकील, समुपदेशक अशा अनेकांची मदत घ्यावी लागते. अशावेळी सखी वन स्टॉप सेंटर पीडितेच्या पाठीशी उभे राहून लढा देत न्याय मिळवून देत आहे. कौटुंबिक हिंसाचार, लैंगिक शोषण, हुंडाबळी, छळ, जाच, ॲसिड हल्ले, आणि बाल लैगिंक शोषणग्रस्त पीडितांना या ठिकाणी मदत केली जाते.

सद्यस्थितीत केंद्रामध्ये एकाच वेळी 5 महिला व्यवस्थित राहू शकतील एवढी क्षमता या निवारा गृहाची आहे. तातडीच्या मदतीसाठी शासनाचा 181 हा महिला हेल्पलाईन क्रमांक कार्यान्वित आहे. जालना जिल्ह्यातील गरजू आणि संकटग्रस्त महिलांनी कोणत्याही भितीशिवाय या क्रमांकावर किंवा सखी केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी राजेंद्र कड, आणि सखी वन स्टॉप सेंटरच्या केंद्र व्यवस्थापक वनिता पिंपळे यांनी केले आहे.

महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी विविध सेवा - या अडीच वर्षांच्या कालावधीत या सेंटरने जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाच्या मदतीने जून 2019 ते मार्च 2026 या कालावधीत आजपर्यंत 875 पीडित महिलांच्या विविध समस्यांवर निवारण करुन त्यांना विविध सेवा उपलब्ध करुन देत न्याय देण्याचे कार्य केले आहे. तसेच वकिल ही उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
आर. व्ही. कड, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जालना.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT