जालना : जालना शहराचा वेगाने होत असलेला विस्तार एका बाजूला विकासाची नवी दिशा दाखवत असताना दुसऱ्या बाजूला कुंडलिका आणि सीना नदी गंभीर प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे. शहरातील घरगुती व औद्योगिक सांडपाणी बहुतांशी प्रक्रिया न करताच थेट नदीपात्रात सोडले जात असल्याने नदीला अक्षरशः ‘काळ्या पाण्याची शिक्षा’ भोगावी लागत आहे.
नदीच्या पाण्याची गुणवत्ता दिवसेंदिवस खालावत असून, जैव-रासायनिक ऑक्सिजन मागणी (बीओडी), रासायनिक प्रदूषण (सीओडी) आणि विरघळलेल्या ऑक्सिजनचे प्रमाण चिंताजनक पातळीवर पोहोचल्याचे पर्यावरण अभ्यासक सांगतात. मात्र, या नदीसाठी स्वतंत्र पाणी तपासणी केंद्र प्रभावीपणे कार्यरत आहे की नाही. नियमित तपासणी होऊन त्यावर काय उपाय योजना केल्यात, या बाबी अजूनही अनुत्तरित आहेत. यामुळे पर्यावरणप्रेमींकडून खंत व्यक्त केली जात आहे.
शहरातील घरांमधून बाहेर पडणारे ब्लॅक वॉटर (शौचालयातील सांडपाणी) आणि ग्रे वॉटर कोणतीही प्रक्रिया न करता नाल्यांद्वारे नदीत मिसळत आहे. दुसरीकडे, औद्योगिक वसाहतींमधून बाहेर पडणारे रसायनयुक्त, विषारी पाणीही थेट नदीत सोडले जात असल्याचे चित्र आहे. यामुळे जलचर सृष्टी धोक्यात आली असून परिसरातील भूजलावरही परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.
महानगरपालिकेचा एसटीपी (सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प) अद्याप पूर्ण क्षमतेने कार्यरत नसल्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. कोट्यवधींचा खर्च करून उभारलेले प्रकल्प कागदावरच मर्यादित राहिल्याने नदी पुनरुज्जीवनाचा प्रश्न अधिकच लांबणीवर पडत आहे.
दरम्यान, काही स्वयंसेवी संस्थांनी सीएसआर निधीतून नदीचे खोलीकरण व रुंदीकरण केले असले, तरी प्रदूषण थांबले नाही तर हे प्रयत्न निष्फळ ठरणार आहेत.
नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी उपाय
प्रत्येक घर व सोसायटीत लघु सांडपाणी प्रक्रिया यंत्रणा (एसटीपी) अनिवार्य करणे
औद्योगिक युनिट्ससाठी ‘झिरो लिक्विड डिस्चार्ज’ नियमाची कडक अंमलबजावणी
नदीकाठी कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई
नियमित पाणी गुणवत्ता तपासणी व अहवाल सार्वजनिक करणे
जलपर्णी नियंत्रणासाठी विशेष मोहिमा राबवणे
नागरिकांमध्ये जनजागृती अभियान व स्वयंशिस्त वाढवणे
नदी संवर्धनासाठी स्थानिक पातळीवर स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करणे.