

डॅनियल काळे
कोल्हापूर ः पंचगंगा नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न गंभीर वळणावर पोहोचला आहे. शहरात उभारलेल्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची क्षमता अपुरी पडत असून दररोज सुमारे 100 एमएलडी सांडपाणी कोणत्याही प्रक्रियेविना थेट नदीत मिसळत आहे. परिणामी आगामी काळात प्रदूषणाची तीवता अधिक वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
शहरातील दोन प्रमुख सांडपाणी प्रक्रिया केंद्रांमधून सुमारे 96 एमएलडी पाण्यावर प्रक्रिया केली जाते. कसबा बावडा येथे 76 एमएलडी तर दुधाळी नाल्यावर 17 एमएलडी क्षमतेचे प्रकल्प कार्यरत आहेत. याशिवाय 6 व 4 एमएलडी क्षमतेचे लघुप्रकल्पही सुरू आहेत. एकूण सुमारे 117 एमएलडी प्रक्रिया क्षमता उभारली असली तरी प्रत्यक्षात शहरातून निर्माण होणारे सांडपाणी या क्षमतेपेक्षा अधिक आहे.
शहरासाठी थेट पाईपलाईन योजना सुरू झाल्यापासून पाण्याचा उपसा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. जुन्या योजनादेखील सुरू असल्याने पाणीपुरवठा वाढला; त्याच प्रमाणात सांडपाणीही वाढले आहे. शहराचा विस्तार, वाढती लोकसंख्या आणि उपनगरांची वाढ यामुळे उपनगरातून येणाऱ्या सांडपाण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. परिणामी प्रक्रिया क्षमतेपेक्षा जादा सांडपाणी थेट पंचगंगेत सोडले जात आहे. 1989 पासून नदी प्रदूषणात सातत्याने वाढ होत आहे. जयंती, गोमंतीसह 12 उपनाल्यांमधून मैलायुक्त पाणी नदीत मिसळते. 2009 पासून महापालिका, जिल्हा प्रशासन व राज्य शासनाने केंद्राच्या मदतीने प्रक्रिया प्रकल्प उभारले; मात्र वाढत्या सांडपाण्यामुळे परिस्थिती अद्याप नियंत्रणात आलेली नाही.
वाढलेल्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी 43.3 एमएलडी क्षमतेचे नवीन प्रकल्प उभारण्याचे काम सुरू आहे. कसबा बावडा, एसएससी बोर्ड परिसर व मस्कुती तलाव येथे ही कामे प्रगतीपथावर आहेत. नदीत मिसळणाऱ्या 12 पैकी 6 नाले अडविण्याचे काम सुरू असून उर्वरित नालेही एसटीपीकडे वळविण्याची योजना आहे. हे प्रकल्प पूर्ण होईपर्यंत दररोज सुमारे 100 एमएलडी सांडपाणी थेट नदीत मिसळतच आहे. फेबुवारीनंतर नदीतील पाण्याचा प्रवाह घटत असल्याने प्रदूषणाची तीवता अधिक वाढते. इचलकरंजीसह नदीकाठावरील गावांनी सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे.